जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आजवर जिल्ह्यात एकूण ४१ हजार ६४८ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी ४० हजार ९७६ व्यक्तींनी कोरोनावर मात केली, तर ६२२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ४९ व्यक्ती उपचाराखाली आहेत. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत ७ हजारांवर व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला, तर दुसऱ्या लाटेत ३३ हजार व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच ४०० पेक्षा अधिक व्यक्तींना जीव गमवावा लागला. मे २०२१ च्या अखेरपासून कोरोना संसर्गाचे प्रमाण घटू लागले. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने घट झाली. त्यात मानोरा तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यंत नगण्य असून, या तालुक्यात सद्यस्थितीत केवळ २ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
----------
९० टक्के ग्रामपंचायती कोरोनामुक्त
जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत मानोरा तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यात गेल्या आठवडाभरात या तालुक्यात केवळ एका व्यक्तीला कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे या तालुक्यातील ७७ पैकी ७० ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. अर्थात तालुक्यातील ९० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट होत आहे.