लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: अमरावती विभागातील १० मोठे आणि २५ मध्यम ्या प्रकल्पांसह मिळून ४४६ लघू प्रकल्पांच्या पातळीत जून महिन्याच्या अखेरपर्यंतच लक्षणीय वाढ झाली आहे. या प्रकल्पांत गतवर्षी २९ जून रोजी ६.९५ टक्के साठा होता, तर यंदा याच तारखेपर्यंत त्यात १६.२४ टक्क्यांनी वाढ होऊन जलसाठा २३.१९ टक्के झाला आहे. तथापि, १० पैकी तीन मोठ्या प्रकल्पांत अद्यापही शुन्य टक्के साठा आहे.अमरावती विभागात अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांत १० मोठे, २५ मध्यम आणि ४११ लघू प्रकल्प मिळून एकूण ४४६ प्रकल्प आहेत. गतवर्षी पावसाळ्याला विलंब झाल्याने जूनअखेरपर्यंतही या प्रकल्पांच्या पातळीत फारशी वाढ झाली नव्हती. त्यामुळे हजारो गावांत पाणीटंचाईची समस्याही कायमच होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला. त्यातच गतवर्षीच्या नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांतील अवकाळी पावसामुळे प्रकल्पांतील पातळीला आधार झाला होता. त्याचा सकारात्मक परिणाम यंदाच्या जून महिन्यातील पातळीवर झाला आहे. सद्यस्थितीत अमरावती विभागातील ४४६ प्रकल्पांत मिळून २३.१९ टक्के उपयुक्त साठा आहे. गतवर्षी २९ जूनपर्यंत या प्रकल्पांत केवळ ६.९५ टक्के साठा होता. विभागातील १० मोठ्या प्रकल्पांच्या पातळीचा विचार करता गतवर्षी या प्रकल्पांत २९ जून रोजी केवळ ७.२१ टक्के उपयुक्त साठा होता. यंदा मात्र याच तारखेपर्यंत त्यात २५.३३ टक्के वाढ होऊन जलसाठा ३२.५४ टक्के झाला आहे. विभागातील २५ मध्यम प्रकल्पांत मिळून २९ जूनपर्यंत १८.९६ टक्के उपयुक्त साठा आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत विभागातील मध्यम प्रकल्पांत केवळ १२.३३ टक्के उपयुक्त साठा होता. अर्थात मध्यम प्रकल्पांची पातळी गतवर्षीच्या तुलनेत यंदा २९ जूनपर्यंत ६.३३ टक्क्यांनी वाढली आहे. लघूप्रकल्पांत फारशी वाढ नाहीविभागातील मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ दिसून येत असली तरी लघू प्रकल्पांच्या पातळीवर विशेष फरक पडलेला नाही. विभागातील ४११ मध्यम प्रकल्पांत मिळून २९ जूनपर्यंत ३.५२ टक्के उपयुक्त साठा आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत विभागातील मध्यम प्रकल्पांत केवळ २.९ टक्के उपयुक्त साठा होता.
अमरावती विभागातील प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 3:52 PM