वाशिम : कोरोनाशी लढा देण्यासाठी पालिकेने हेल्पलाइन, पथकांचे गठण तसेच आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. यावर रुग्णांच्या नातेवाइकांचे कॉल येत असून, यामध्ये प्रामुख्याने ‘साहेब, रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्या, नाहीतर रुग्णाची परिस्थिती बिकट होईल’, या मागणीचा सर्वाधिक समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ३४००च्या वर असून, कोरोनाशी लढा देण्यासाठी नगरपालिकांनी पथकांचे गठण केले आहे तसेच हेल्पलाइन, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची चमू, त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. रिसोड नगर परिषदेने नऊ पथके गठित केले असून, प्रत्येक पथकात चार ते पाच सदस्यांचा समावेश आहे. याशिवाय आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. एक मोबाइल व्हॅनही उपलब्ध केली आहे. दैनंदिन जवळपास १०० नागरिकांचे कॉल येत असून, लसीकरणासाठी लस केव्हा उपलब्ध होईल, गृहविलगीकरणातील रुग्ण घराबाहेर पडत आहेत, संचारबंदीतही दुकाने सुरू आहेत, उपचारासाठी कोणते हॉस्पिटल योग्य राहिल, रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत का यासंदर्भात विचारणा केली जात आहे. त्यानुसार समुपदेशन करीत निरसन करण्याचा तसेच मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न नगर परिषदेतर्फे सुरू असल्याचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी सांगितले.
०००
बॉक्स
नऊ पथकांचे गठण
१) रिसोड नगर परिषदेने नागरिकांच्या सोयीसाठी नऊ पथक तसेच आरोग्य विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले. एक मोबाइल व्हॅनही आहे. प्रत्येक पथकात चार ते पाच सदस्य असून, त्यांच्यावर प्रभागाची जबाबदारी सोपविली आहे. नागरिक, रुग्ण, नातेवाइकांचा कॉल आल्यानंतर त्याचे निरसन करण्याचे काम केले जाते.
२) लसीकरण मोहिम, अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न, गृहविलगीकरणातील रुग्णांचे समुपदेशन व नियंत्रण आदी प्रकारची कामे केली जातात.
००००
कोट बॉक्स
रिसोड नगर परिषदेने नऊ पथकांचे गठण केले तसेच एक मोबाइल व्हॅन आहे. आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले असून, यावर विविध स्वरूपांतील दैनंदिन सरासरी १०० कॉल येतात.
- गणेश पांडे, मुख्याधिकारी, नगर परिषद, रिसोड
०००००
कोणाला ऑक्सिजन हवा, तर कोणाला रेमडेसिविर इंजेक्शन
जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनची जास्त गरज असल्याचे रुग्ण, नातेवाइकांच्या मागणीवरून दिसून येते.
विशेषत: रेमडेसिविर इंजेक्शनसाठी जास्त वणवण होत आहे. शेवटचा पर्याय म्हणून नगर परिषदांच्या चमूकडेही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होईल का? याबाबतही चौकशी केली जाते.
गृहविलगीकरणातील रुग्ण घराबाहेर पडतात, या स्वरूपातील कॉलही येतात्. यानुसार संबंधित रुग्णाचे समुपदेशन केले जाते.
०००००
वाशिम नगर परिषद..
वाशिम नगर परिषदेत हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध नाही. मात्र, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाइल क्रमांक जाहीर केले आहेत. यावरही आरोग्यविषयक स्वरूपातील कॉल येतात तसेच रुग्णवाहिका व अन्य सोयी-सुविधांबाबत विचारणा करण्यात येते. नागरिकांच्या कॉलनुसार त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जातो, असे सांगितले जात आहे.