वाशिम : अंगणवाडी केंद्रांत आवश्यक त्या सुधारणा केल्याने वाशिम तालुक्यातील सहा अंगणवाडी केंद्रांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे.एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत शून्य ते तीन वर्षे वयोगटांतील मुलांसाठी लसीकरण, तीन ते सहा वर्षें वयाच्या मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षण, किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक-आहारविषयक मार्गदर्शन, गरोदर-स्तनदा मातांसाठी विविध शिबिरे व मार्गदर्शन असे विधायक कार्य अंगणवाड्यांमधून केले जातात.
अंगणवाडी केंद्र बोलकी व्हावी तसेच अंगणवाडीतील लाभार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी १५ वा वित्त आयोग व ग्रामपंचायत अंतर्गत निधीतून अंगणवाड्या डिजिटल करण्याबाबत दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांचे मार्गदर्शनात वाशिमचे बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी सावरगाव बरडे, फाळेगाव थेट, वारला क्र. २,वारला क्र.३, पार्डी एकबुर्जी व शिरपुटी क्र.२ अशा एकूण सहा अंगणवाडी केंद्र आयएसओ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. अंगणवाड्या आयएसओ होण्यामागे अंगणवाडी इमारती बोलक्या ,स्वच्छ व सुंदर व्हाव्यात हा मूळ उद्देश आहे.