००००
व्हायरल फिव्हरची साथ, ग्रामस्थ त्रस्त
वाशिम : वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिव्हरची साथ सुरू आहे. अनेकांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास होत आहे. कोरोनाची हीच लक्षणे असल्याने ग्रामस्थांनी धास्ती घेतल्याचे चित्र आहे.
००
लॉकडाऊनमुळे रसवंती संचालक संकटात
वाशिम : दरवर्षी उन्हाळ्यात रसवंतीचालकांचा चांगला व्यवसाय होत होता़; मात्र मार्च महिन्यापासूनच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लादण्यात आले आहेत़ त्यामुळे रसवंती संचालक आर्थिक संकटात सापडले आहेत.
००
रिसोड शहरात आणखी १० कोरोना रुग्ण
वाशिम : रिसोड शहरात रविवारी आणखी १० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभागातर्फे नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनी तपासणी करून घेण्याचे आवाहनही केले जात आहे.
०००
रिठद परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
वाशिम : रिठद परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. संबधितांनी लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नारायणराव आरू यांनी शुक्रवारी बांधकाम विभागाकडे केली.
०००
जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी
वाशिम : ग्रामीण भागातील प्रत्येक वस्त्यांमध्ये जंतुनाशक द्रावणाची फवारणी करावी, अशी मागणी तेजराव वानखेडे यांनी निवेदनातून केली आहे. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचेही निवेदनात म्हटले आहे.
००
केनवड येथे आरोग्य तपासणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील केनवड येथे आणखी तीन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे रविवारी निष्पन्न झाले. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध नागरिकांची रविवारी तपासणी करण्यात आली आहे.
०००००
संचारबंदीमुळे पशुखाद्य महागले
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या उद्रेकामुळे जिल्ह्यात संचारबंदी आहे. अशा परिस्थितीत गत काही दिवसांपासून पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
००
गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा
वाशिम : गुटखा विक्री करणे कायद्याने गुन्हा असतानाही कारंजा तालुक्यात व जिल्ह्यात गुटखा विक्री सुरू आहे. ती बंद करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
००
चिखली परिसरात तलाठ्याचे पद रिक्त
वाशिम : रिसोड तालुक्यातील चिखली परिसरात तलाठ्यांचे पद गेल्या वर्षभरापासून रिक्त असून, येथील प्रभार इतर तलाठ्यांकडे दिला आहे. रिक्त पदे भरण्याची मागणी शेतकऱ्यांनी शुक्रवारी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली.