लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १६ आॅगस्टच्या सायंकाळपासून कमी-अधिक प्रमाणात असलेल्या पावसाचा जोर मंगळवारीही कायम आहे. जिल्ह्यात सकाळपासूनच सर्वदूर पाऊस असून, हिसई गावाजवळ बाभळीचे झाड पडल्यामुळे मंगरूळपीर-शेलुबाजार मार्गावरील वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला. दरम्यान, गत २४ तासांत २१ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४०.३६ मीमी पाऊस झाला. गत सहा दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. १६ आॅगस्ट रोजी कारंजा व मानोरा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. मानोरा तालुक्यात शुक्रवार, १७ आॅगस्टपासून सर्वेक्षणाला सुरूवातही झाली होती. शनिवार, रविवारी पावसाने थोडी उसंत घेतल्यानंतर सोमवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. मंगळवारी सकाळपासूनच पाऊस ठाण मांडून असल्याने सर्वेक्षणाचे कामही ठप्प पडले आहे. २० व २१ आॅगस्टच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. शेतीची कामे सहाव्या दिवशीही ठप्प असल्याचे दिसून येते. शहरांमधील नाल्यांची साफसफाई व्यवस्थित झाली नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मंगरुळपीर ते शेलुबाजार या महामार्गावरील हिसई गावाजवळ बाभळीचे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला.
सरासरी ४० मीमी पावसाची नोंद..!गत २४ तासांत २१ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४०.३६ मीमी पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस वाशिम तालुक्यात ५५.४६ मीमी झाला. त्याखालोखाल मालेगाव तालुक्यात ५०.५० मीमी, रिसोड तालुक्यात ४१.४८ मीमी, कारंजा तालुक्यात ४०.५० मीमी, मंगरूळपीर तालुक्यात २८.५७ मीमी आणि मानोरा तालुक्यात २५.६७ मीमी पाऊस झाला.