लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाकाळात निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी, मोबाईलवेड, मानसिक समस्या व निराशा यासह विविध कारणांमुळे अनेकांना निद्रानाशेचा त्रास जाणवू लागला आहे. पुरेशी झोप झाली नाही तर त्याचा मानवी आरोग्यावरही विपरित परिणाम होतो.कोरोनाने सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले आहेत तसेच काही आरोग्यविषयक समस्याही निर्माण होत आहेत. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावला, आर्थिक अडचणी वाढल्या याबरोबरच घरातच राहावे लागत असल्याने मुलांना मोबाईल वेडही जडले. टेन्शन, मानसिक ताण, नियमित व्यायाम व सकस आहाराचा अभाव आदी कारणांमुळेदेखील पुरेशी झोप होत नाही. निरोगी आरोग्यासाठी वयोगटानुसार किती तास झोप असावी, याबाबत आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनाही आहेत. कमी झोप झाली तर रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यासह विविध आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. त्यामुळे वेळीच सावध होऊन निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप होईल, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
झोप का उडते?
१) विविध कारणांमुळे झोप उडते. आर्थिक यासह विविध गंभीर स्वरुपाच्या अडचणी, मानसिक चिंता, हार्मोन्स कमी होणे, टेन्शन आदी कारणांमुळे झोप येत नाही तसेच झोप उडते.२) मेंदु विकार, खोलीत लख्ख प्रकाश, गोंगाट किंवा आवाज आदी कारणांमुळेदेखील झोप उडू शकते.३) जास्त वेळ टिव्ही बघणे, मोबाईलवर खिळत राहणे, हार्मोन्स कमी होणे, सकस आहाराचा व नियमित व्यायामाचा अभाव यामुळे झोप येत नाही.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची कोणतीही गोळी नकोविविध कारणांमुळे झोप येत नसेल तर कधी-कधी अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झोपेची गोळी घेतात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी घेणे आरोग्यासाठी हानीकारकही ठरू शकते. झोपेची गोळी काही वेळेला घेतली तर या गोळ्यांची सवयही जडू शकते. त्यामुळे सल्ल्याशिवाय झोपेची गोळी घेऊ नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले.
झोप कमी झाल्याचे दुष्परिणामरोगप्रतिकारशक्ती कमी होणे.आजाराशी लढण्याची शक्ती कमी होणे.भूक कमी होणे, थकवा जाणवणे.मानसिक समस्या निर्माण होणे.
० ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या निरोगी जीवनासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. मुलांना शक्यतोवर मोबाईल, टिव्हीपासून दूर ठेवावे. पुरेशी झोप झाली नाही तर याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.- डॉ. रत्नेश परळकरबालरोग तज्ज्ञ,
झोपेवर मानवाचे आरोग्य अवलंबून आहे. चांगली झोप झाली तर शरीराच्या हार्मोन्सवर चांगले परिणाम होतात. हार्मोन्स व पर्यायाने पचनक्रिया वाढते. प्रत्येक पेशीची कार्यक्षमता वाढते. झोप कमी झाली तर रोगप्रतिकारशक्तीही कमी होते.- डॉ. मंगेश राठोड, मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम.