लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लसीचा सर्वत्रच तुटवडा असून, वाशिम जिल्ह्यातही लसीकरण मोहीम कासवगतीने सुरू असल्याचे दिसून येते. दररोज ३७०० डोसची गरज असताना कोविशिल्ड लसीचे केवळ ६०० ते ७०० डोस उपलब्ध होतात. त्यामुळे अनेकांना दुसऱ्या डोससाठी वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे.देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा आलेख वाढल्याने सर्वांचीच चिंताही वाढली. दिवसागणिक झपाट्याने वाढत चाललेल्या या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकीकडे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले; तर दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेलाही गती देण्यात आली. १६ जानेवारीपासून फ्रंट लाईन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. दरम्यान, गत एका महिन्यातपासून कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याने लसीकरण मोहीमही प्रभावित होत आहे. लसीअभावी अर्धेअधिक केंद्र प्रभावित झाले आहेत. दैनंदिन ३७०० ते ३८०० डोसची गरज असताना केवळ ६०० ते ८०० दरम्यान डोस मिळतात. आठवड्यातून एका वेळी उपलब्धतेनुसार १२ ते १८ हजारादरम्यान डोस मिळतात. एका आठवड्यात किमान २९ हजार डोस मिळणे अपेक्षित आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत कमी डोस मिळत असल्याने लसीकरण मोहीमही प्रभावित होत आहे तसेच दुसऱ्या डोससाठी नागरिकांना वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे.
केवळ ३३ केंद्र सुरूमागणीच्या तुलनेत लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण रुग्णालय स्तरावर सात, जिल्हा सामान्य रुग्णालय एक आणि २५ प्राथमिक आरोग्य केंद्र अशा एकूण ३३ केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे. यापैकी काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीचा साठा संपल्याने ते तूर्तास बंद असल्याची माहिती आहे. येत्या तीन, चार दिवसांत लसीचा साठा उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात १८-४४ वयोगटांतील लसीकरणजिल्हा सामान्य रुग्णालय, तसेच सहा ग्रामीण रुग्णालय स्तरावरील केंद्रात, नोंदणी केलेल्या आणि मोबाईलवर संदेश प्राप्त झालेल्या १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात येत आहेत. ४५ वर्षांवरील नागरिकांना वाशिम शहरातील जुने नगर परिषद इमारतीजवळील आरोग्य केंद्र व लाखाळा परिसरातील न. प. शाळा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर कोविशिल्ड लसीचे डोस देण्यात येतात.