लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांची जमीन सुपिक व्हावी आणि प्रकल्पाची साठवण क्षमताही वाढावी, या उद्देशाने जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळ उपसा करण्यासाठी ७३ प्रकल्पांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते; परंतु यातील केवळ ७ प्रकल्पांतील गाळ उपशाचे काम पूर्ण होऊ शकले आहे. त्यामुळे या अभियानाचा यंदा म्हणवा तेवढा फायदा होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.जिल्ह्यात यंदा गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत सहा तालुक्यातील मिळून ७९ प्रकल्पांतील गाळ उपसा करण्याबाबतचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी स्तरावर सादर करण्यात आले होते. त्यापैकी ७३ प्रस्तावांना उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. शेतकºयांना या प्रकल्पातील गाळ शेतात टाकण्यासाठी मोफत दिला जाणार होता, तर गाळ उपशामुळे प्रकल्पांची खोली वाढून जलसाठ्यात मोठी वाढ होणार होती. तथापि, मंजूर करण्यात आलेल्या ७३ प्रस्तावांपैकी केवळ ५० प्रकल्पांतील गाळ उपशाच्या कामाला सुरुवात होऊ शकली आणि त्यातील केवळ ७ प्रकल्पांतील गाळाचा उपसा होऊ शकला. यात मालेगाव तालुक्यातील एका प्रकल्पातून ३० हजार घनमीटर, वाशिम तालुक्यातील ५ प्रकल्पांतून ७० हजार ८०८ घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. त्याशिवाय मंगरुळपीर तालुक्यातील एका प्रकल्पातील गाळ उपशाचे कामही पूर्ण करण्यात आले. दरम्यान मानोरा तालुक्यातील तीन प्रकल्पांत काम सुरू करण्यात आल्यानंतर या प्रकल्पांतून ३३ हजार ५० घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. प्रकल्पातील ओलाव्यामुळे सुरुवातीच्या काळात हे अभियान राबविण्यात अडचणी निर्माण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सद्यस्थितीत वाशिम तालुक्यातील एक, मंगरुळपीर तालुक्यातील दोन आणि मानोरा तालुक्यातील तीन प्रकल्पातील गाळ उपशाचे काम प्रगतीपथावर आहे. २३ प्रकल्पांची कामे सुरुच झाली नाही !जिल्ह्यात उपविभागीय स्तरावरून ७३ प्रकल्पांतील गाळ उपशाच्या कामांना मंजुरी मिळाली. त्यापैकी ५० प्रकल्पांत कामाला सुरुवात तरी, केवळ ७ प्रकल्पांतील गाळाचा उपसा झाला, ६ प्रकल्पांतील गाळाचा उपसा सुरू आहे, तर १८ प्रकल्पांचे काम बंद करण्यात आले आहे. उर्वरित २३ प्रकल्पांत गाळ उपशाचे काम सुरू होऊ शकले नाही. आता पावसाळ्याला सुरूवात झाली असून, प्रकल्पात पुन्हा पाण्याचा संचय सुरू झाला आहे किंवा गाळात ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रगतीपथावर असलेली कामेही प्रलंबित राहून केलेला खर्च व्यर्थ ठरणार असल्याचे दिसत आहे.गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानात मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांपैकी ५० हून अधिक प्रकल्पांची कामे सुरु करण्यात आली. त्यापैकी ७ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून, इतर १४ प्रकल्पांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. या कामांसाठी शेतकºयांचा प्रतिसाद न लाभल्याने कामे पूर्ण करण्यात अडथळा आला.-लक्ष्मण मापारीउपकार्यकारी अभियंताजलसंधारण विभाग, वाशिम
वाशिम जिल्ह्यात केवळ ७ प्रकल्पांतील गाळ उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 2:33 PM