लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागांत सापांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे ग्रामस्थ सावधगिरी बाळगत असून, सर्पमित्रांचे पथक मात्र वारंवार आढळणाºया सापांना पकडून जंगलात सोडत जीवदान देत आहेत. आॅगस्ट महिन्यात आजवर १८ दिवसांतच सर्पमित्रांनी विषारी आणि बिनविषारी मिळून ४४ सापांना जीवदान दिले आहे. जिल्ह्यात जुलैच्या अखेरीस आणि आॅगस्टच्या सुरुवातीस दमदार पाऊस पडला. यामुळे शेतशिवार हिरवेगार झाले असून, ग्रामीण भागांतही गावालगत झाडेझुडपे वाढली आहेत. या झुडपांमुळे खाद्याचा शोध घेण्यासाठी सरपटणाºया प्राण्यांचा संचार वाढला आहे. त्यात विंचू, सरडे, घोरपड आणि सापांचा समावेश आहे. मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात मिळून अवघ्या १८ दिवसांतच वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सर्पमित्रांनी ४४ सापांना जीवदान दिले आहे. विषारी आणि बिनविषारी मिळून ४४ सापांना जीवदान दिले आहे. वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरसी या संघटनेच्या कोलार आणि वनोजा येथील शाखेचे सदस्य सापांबाबत जनजागृती करीत असल्याने आता लोक सापाला ठार न मारता या संघटनेच्या सर्पमित्रांना बोलावत आहेत. त्यामुळे सापांचा जीव वाचत असून, गेल्या दोन वर्षांत या संघटनेने दोन हजारांवर सापांना जीवदान दिले आहे. दरम्यान, ग्रामीण परिसरात सापांचा संचार वाढला असला तरी, लोकांनी घाबरून जाता सर्पमित्रांना तातडीने पाचारण करावे आणि स्वत:ला सुरक्षीत ठेवण्यासह सापांचाही जीव वाचविण्यास हातभार लावावा, असे आवाहन मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांनी केले आहे. नागांचे प्रमाण अधिक मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात गत काही दिवसांत आढळून आलेल्या सापांत पानदिवड, तस्कर, डुरक्या घोणस, कवड्या, धामण या सापांचा समावेश असला तरी नागांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे. आॅगस्ट महिन्यात सर्पमित्रांनी पकडलेल्या ४४ सापांपैकी तब्बल १८ नाग, तर एक मण्यार साप होता. हे दोन्ही साप अत्यंत विषारी असतानाही नागरिकांनी त्यांना ठार न करता सर्पमित्रांना कळवून त्यांना पकडण्यास सहकार्य केले. सर्पमित्रांनीही सुरक्षीतपणे या सापांना पकडून जंगल परिसरात सोडण्याची मोठी कामगिरी केली.
ग्रामीण भागांत सापांचा संचार वाढला; १८ दिवसांत ४४ सापांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 3:16 PM