लोकमत न्यूज नेटवर्ककिनखेडा : नित्यनेमाप्रमाणे विद्यार्थी शाळेत आले आणि शिक्षकांकडून त्यांना शिकविणे सुरू झाले. अशातच इयत्ता तिसरीच्या वर्गखोलीतील उखळलेल्या फरशीखालून साप निघाला आणि एकच धांदल उडाली. हा गंभीर प्रकार किनखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत गुरूवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडला. दरम्यान, मोडक्यातोडक्या वर्गखोल्यांची तत्काळ दुरूस्ती करा. तोपर्यंत पाल्ल्यांना शाळेत पाठविणार नाही, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे.किन्हीराजा येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोल्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असून विद्यार्थी ज्याठिकाणी बसून शिक्षण घेतात, तेथील फरश्या उखडल्या आहेत. वर्गखोल्यांची दुरूस्ती करण्याबाबत पालकांनी वेळोवेळी आवाज उठविला; मात्र त्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले. गुरूवारी तर वर्गखोलीतील उखळलेल्या फरशीखालून चक्क साप निघाल्याने विद्यार्थी भयभीत झाले. यादरम्यान गावकऱ्यांनी धाव घेऊन सापाला ठार मारले. या प्रकारामुळे शिक्षणाच्या बाबतीत असलेली प्रशासकीय उदासिनता चव्हाट्यावर आली आहे.कृती विकास आराखड्यात शाळा दुरुस्तीचा समवेश नसल्यामुळे वर्गखोल्यांच्या दुरूस्तीकरिता ग्रामपंचायतीकडून निधी देता येत नाही.- प्रमोद भगतसचिव, ग्रा.पं. किनखेडा
जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोलीत चक्क साप निघाल्यामुळे पालक मुलांना शाळेत न पाठविण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. याबाबत सरपंच, सचिवांशी संपर्क साधला; परंतु त्यांनी विशेष प्रतिसाद दिला नाही.- ज्ञानेश्वर अवचारअध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, किनखेडा