(फोटो प्रातिनिधिक)
उंबर्डा बाजार : शेतामधील वीजखांबाच्या स्टार्टर बॉक्समध्ये दडून बसलेल्या नाग जातीच्या सापाला अलगद बाहेर काढून जीवदान देण्याची कामगिरी सर्पमित्र तैमुरभाई यांनी केली. कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजारमधील शिवारात २८ जुलै रोजी अनेकांनी हा थरारक प्रकार पाहिला.
खरीप हंगामातील पिके पावसामुळे चांगलीच वाढली असून, या पिकांत सरपटणाºया जिवांचा संचार होत आहे. उंबर्डा बाजार येथे २८ जुलै रोजी एका शेतात नाग जातीचा साप चक्क कृषीपंपाच्या जोडणीसाठी उभारलेल्या वीजखांबाच्या स्टाटॅर बॉक्समध्ये दडून बसला होता. शेतकºयाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्याची भितीने गाळणच उडाली. त्यांनी तात्काळ गावातील सर्पमित्र तैमुरभाई यांना ही माहिती दिली. तैमुरभाई यांनी तातडीने शेत गाठले आणि स्टार्टर बॉक्सचे झाकन बाजुला करून आत दडून बसलेला नाग सहजच पकडला. स्टार्टर बॉक्समध्ये दडलेला नाग पाहून लोकांची भितीने गाळण उडत असताना तैमुरभाई यांनी मात्र या नागाला कोणतीही इजा न होऊ देता बाहेर काढले आणि जंगलात सोडून जीवदान दिले.