जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त अर्जांची पडताळणी करण्यात आली. अनेक अर्ज हे महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेत अंगीकृत नसलेल्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांचे आहेत. अशा खासगी रुग्णालयांशी संबंधित अर्जांबाबत महात्मा जोतीराव फुले योजनेंतर्गत खर्चाचा परतावा करण्याची कुठलीही तरतूद नाही. महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत असलेली देवळे, बिबेकर, लाइफ लाइन, वाशिम क्रिटिकल केअर आदी रुग्णालये जिल्हा प्रशासनाने कोविड रुग्णालये म्हणून घोषित केली होती. या रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या पात्र लाभार्थ्यांना जर योजनेंतर्गत मोफत उपचार मिळाला नसेल, तर असे लाभार्थी जिल्हा संनियंत्रण व तक्रार निवारण समिती जिल्हा कार्यालय, महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना, वाशिम या ठिकाणी तक्रार अर्ज सादर करू शकतात. सोबत उपचारासंबंधित सर्व कागदपत्रे व मूळ बिल अथवा पावती सादर करणे आवश्यक राहणार आहे.
००००००
कोट
कोविड-१९ मुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांना मदत देण्याबाबतसुद्धा अद्याप कोणतेही निर्देश शासनामार्फत प्राप्त झालेले नाहीत. या अनुषंगाने समाजमाध्यमातून फिरत असलेले संदेश हे चुकीचे असून, कोणत्याही व्यक्तीने यावर विश्वास ठेवू नये.
-डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक