वाशिम : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख मनोहर कुळकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचा रविवारी (दि.३०) आयोजित वाशिम दौराही वादग्रस्त ठरला. स्थानिक अकोला नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान असलेल्या काळे लाॅन येथे व्याख्यानासाठी भिडे येणार असल्याचे समजताच, विविध संघटना, राजकीय पक्षांनी भिडे यांच्या निषेधार्थ अकोला नाकास्थित रस्त्यावर उतरून आंदोलन केले, निदर्शने दिली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून दुसऱ्या मार्गाने संभाजी भिडे यांना सभास्थळी नेण्यात आले. कडेकोट बंदोबस्तात भिडे यांचे व्याख्यान पार पडले.
महात्मा गांधींसह महापुरूषांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने अडचणीत आलेले भिडे यांचे रविवारी सकाळी १० वाजता येथील काळे लाॅन येथे व्याख्यान आयोजित केले होते. भिडे येणार असल्याची माहिती मिळताच विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांचे पदाधिकारीदेखील आक्रमक झाले होते. ही सभा उधळून लावण्याचा इशारादेखील निवेदनाद्वारे काही संघटना, पदाधिकाऱ्यांनी दिलेला असल्याने सभास्थळाच्या ५०० मीटर परिसरात प्रचंड फौजफाटा तैनात होता.
सकाळी १० वाजताच्या सुमारास अकोला नाका येथे विविध संघटना, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून तसेच निदर्शने देवून भिडे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. सकाळी ११:१० वाजताच्या सुमारास आगमन होताच भिडे यांनी दुसऱ्या मार्गाने पोलिस बंदोबस्तात सभास्थळी नेण्यात आले. कार्यक्रमासाठी अनेकांनी गर्दी केली होती. परंतू, ओळख पटवूनच आतमध्ये सोडण्यात येत होते. प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनादेखील प्रवेश नाकारण्यात आला. सुमारे तीन तास भिडे सभागृहामध्ये होते.