जिल्ह्यात विविध कॉलनीमध्ये पतंगोत्सव सुरू झाला असून आकाशात मोठ्या प्रमाणात पतंग उडताना दिसून येत आहेत. मात्र पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येत असलेला दोरा, मांजा घातक असून मांजामध्ये विविध रासायनिक द्रव, काचेची भुकटी टाकली जात असल्याने ते आरोग्यास धोकादायक आहे. पतंगासाठी वापरण्यात येत असलेल्या दोऱ्याने अनेकांची बोटे कापली जात आहेत. पतंग उडविताना तो उत्सव म्हणून साजरा करा, असे आवाहन मारवाडी युवा मंच, निसर्ग युवा मित्र मंडळ, छावा, राजरस्त्न संस्थांसह विविध संघटनांकडून केले जात आहे. तसेच याबाबत जनजागृतीही केली जात आहे. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येत असलेला दोरा (मांजा) शरीरासाठी घातक असल्याने याचा वापर टाळावा व कपडे शिवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या दोऱ्याचा वापर करावा. यासंदर्भात विविध संघटना शहरात जनजागृती करीत असताना दिसून येत आहे.
..................
‘मांजा’मुळे पक्ष्यांच्या जीवितास धोका; पक्षिमित्रांतर्फे जनजागृती
आधीच विविध मोबाइल कंपन्यांच्या टॉवरमुळे पक्ष्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. चिमण्यांचा शोध घेता दिसून येत नाहीत. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येत असलेला दोरा (मांजा) विजेच्या तारांवर, झाडांवर गुुंतून राहत असल्याने त्यामुळे पक्ष्यांच्या जीवितास धोका असल्याची जनजागृती पक्षिमित्रांतर्फे करण्यात येतेय.
...............
बालकांसाठी विशेष पतंग
बाजारात लागलेल्या दुकानांमध्ये बालकांसाठी विशेष पतंग आहेत. यामध्ये बेन टेन, ड्युक अॅण्ड डोनॉल्ड, शक्तिमान, भीम यांच्यासह कार्टून पात्रांचे चित्र पतंगावर आहे. बालक पतंग खरेदीसाठी आग्रह धरीत असल्याचे दिसून येत आहे.
............
पतंगासाठी वापरण्यात येत असलेल्या दोऱ्यामध्ये रासायनिक द्रव्याचा अवलंब होत आहे. पूर्वी तयार केल्या जाणाऱ्या मांजापेक्षा तो त्वचेसाठी हानिकारक आहे. तो न वापरणेच बरे. तसेच लहान मुलांना पतंग देताना त्यांना साधा दाेरा देणे गरजेचे आहे. त्यांची त्वचा मुलायम असल्याने धाेका निर्माण हाेऊ शकताे.
- डॉ. अनिल कावरखे
वैद्यकीय अधिकारी, जिसारू, वाशिम
...................