स्थानिक मॉ गंगा मेमोरिअल हॉस्पिटल येथे १ जूनरोजी यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. हरिष बाहेती होते. बैठकीत सुजलाम सुफलाम अभियानाचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, भारतीय जैन संघटना जिल्हाध्यक्ष नीलेश सोमाणी, पाणी फाऊंडेशनचे सुभाष नानवटे उपस्थित होते. यावेळी वाशिम जिल्हयात नदीचे उगमस्थान, नाल्याचे उगम व पाणीटंचाई या विषयांवर चर्चा करण्यात येऊन सर्व सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन प्रशासनाच्या सहकार्याने जिल्हयात पाणी क्षेत्रात भरीव कार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने प्रत्येक तालुक्यातील नदी, नाले यांची माहिती, रूंदीकरण व खोलीकरण कार्य उगमस्थानापासून, तर शेवटपर्यंत मोठया पाणीक्षेत्रात करावयाचे कार्य याबाबत सविस्तर नकाशा तयार करण्यात येऊन त्यावर चर्चा करण्यात आली. सोबतच जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक करून पुढील दिशा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. हरिष बाहेती यांनी संघटन शक्तीमध्ये मोठे बळ असते, त्यामुळे पाणी क्षेत्रात जिल्हयात मोठे कार्य व्हावे, या हेतूने आपण सर्व पाणी क्षेत्रातील कार्य करणार्या संघटनांनी एकत्रितपणे येऊन कार्य करण्याचे आवाहन केले. भारतीय जैन संघटनेने याबाबतीत वरिष्ठ पातळीवर पदाधिकार्यांशी चर्चा केली. त्यांनीही या कार्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच वाशिम जिल्हयात पाणीदार होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निर्णय होऊन मोठे कार्य उभे राहण्याचे संकेत निर्माण झाले आहे.
जिल्हा पाणीदार करण्यासाठी सामाजिक संघटना एकत्रित येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:29 AM