----------
अज्ञात वाहनाने माकडाला चिरडले
मानोरा: अज्ञात वाहनाखाली चिरडून माकडाचा मृत्यू झाल्याची घटना मानोरा तालुक्यातील कोलार-मानोरा मार्गावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यासंदर्भात निसर्ग स्पर्श फाउंडेशनच्या कोलार येथील सदस्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत माकडाला जंगलात दफन केले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे.
-----
चोरीचा तपास थंड बस्त्यात
कामरगाव : मागील काही दिवसांत कामरगाव पोलीस चौकी अंतर्गत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याप्रकरणी पोलिसांत संबंधितांनी तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात व्यक्तीवर गुन्हेही दाखल करण्यात आले; परंतु या प्रकरणाचा तपास अद्यापही पूर्ण होऊ शकला नाही. शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढल्याचे गतवर्षातील आकडेवारीवरून दिसत आहे..
-----
पोलिसांकडून वाहनांची तपासणी
पोहरादेवी : यवतमाळ जिल्ह्यातून येणारे वाहनचालक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचा प्रकार मानोरा पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी गत आठवड्यापासून पोहरादेवी परिसरातील मार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली आहे. यात शुक्रवार ते रविवारदरम्यान १५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
----
पाणीपुरवठा योजना ठप्प
वनोजा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून चालविली जाणारी वनोजा चार गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सध्या बंद आहे. यामुळे गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता योजना पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी संबंधित गावातील ग्रामस्थांकडून सोमवारी करण्यात आली. जीवन प्राधिकरणाने याची दखल घेणे आवश्यक आहे.