मानोरा तालुक्यातील म्हसणी या गावाला कारंजा-मानोरा या मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी इंझोरी-म्हसणीदरम्यान चार किलोमीटर अंतराच्या डांबरी रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे इंझोरी आणि म्हसणी येथील ग्रामस्थांनाही दळणवळणाची चांगली सुविधा उपलब्ध झाली. या मार्गावरून दुचाकी, ऑटोरिक्षा, ट्रॅक्टरसह मालवाहू वाहनांची वर्दळ नेहमीच सुरू असते. प्रामुख्याने ग्रामीण भागातून शहरात विविध कामानिमित्त येणारे ग्रामस्थ आणि शेतमालाची बाजारात विक्री करण्यासाठी शेतक-यांची अनेक वाहने धावतात. या रस्त्याशिवाय म्हसणी गावाला कारंजा-मानोरा रस्त्याशी जोडणारा दुसरा कुठलाही रस्ता नाही. त्यामुळे या रस्त्याची स्थिती चांगली असणे आवश्यक असताना सद्यस्थितीत या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे नाहीसे झाले असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालकांना वाहन चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवून वाहन पुढे न्यावे लागते. त्यात रस्त्यावर पसरलेल्या मातीमुळे धुळीचे लोट हवेत पसरून चालक, प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
---------------
तीन वर्षांपूर्वीच झाली होती दुरुस्ती
साधारण २० वर्षांपूर्वी इंझोरी-म्हसणी रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या काही वर्षांपूर्वी या रस्त्याची दुर्दशा झाल्याने बांधकाम विभागाकडून तीन वर्षांपूर्वी पुन्हा या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. तथापि, अवघ्या तीन वर्षांच्या काळातच या रस्त्यावरील डांबर नाहीसे होऊन खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालकांसह, प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने या रस्ता कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे.
===Photopath===
080121\08wsm_3_08012021_35.jpg
===Caption===
चार किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर माती, खड्डे