वाशिम, दि. ४- शेतीला अखंडीत वीज मिळावी, वीज देयकांचा खर्च कमी व्हावा, या उद्देशाने अंमलात आलेल्या सौरकृषीपंप योजनेत जिल्ह्याला १३00 पंप मंजूर आहेत. यासाठी ५ एकराखालील शेतकर्यांना ९५ टक्के अनुदान दिले जाते. मात्र, उर्वरित पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरण्याबाबत शेतकरी उदासिन आहेत. परिणामी, १३00 चे उद्दीष्ट असताना आजमितीस केवळ १६९ सौर कृषीपंप कार्यान्वित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी आणि हरित ऊज्रेसाठी सौर कृषीपंप योजनेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. अपारंपारिक उर्जास्त्रोतांपैकी सौरऊर्जा हा स्त्रोत शाश्वत आणि निरंतर असल्याची बाब लक्षात घेवून राज्यशासनाने शेतकर्यांना सौर कृषीपंप देण्याची योजना जाहीर केली. याअंतर्गत संपूर्ण राज्यात ७ हजार ५४0 सौर कृषीपंप दिले जाणार आहेत. त्यात वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला ७५0 ए.सी. आणि ५५0 डी.सी., असे एकंदरित १ हजार ३00 पंप आले आहेत. तथापि, योजनेचा लाभ देताना पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असणार्या शेतकर्यांना ३.५ किंवा ७.५ अश्व क्षमतेचे सौर कृषीपंप दिले जात आहेत. त्याकरिता शासनाकडून तब्बल ९५ टक्के अनुदान देय आहे; तर पाच एकरपेक्षा अधिक जमीन असणार्या शेतकर्यांना ८५ टक्के अनुदान दिले जाते. असे असताना जिल्ह्यात या योजनेला फारच अल्प प्रतिसाद मिळत आहे. महावितरणच्या वतीने यासंबंधी प्रभावी जनजागृती करण्यात आली. त्यास प्रतिसादही मिळाला. त्यानुसार, ३१ डिसेंबर २0१६ पर्यंत या योजनेअंतर्गत १२५४ शेतकर्यांनी अर्ज सादर केले. त्यापैकी ६७१ प्रस्तावांना महावितरणकडून मान्यता देण्यात आली. मात्र, ६७१ पैकी केवळ २७४ लाभार्थीनींच त्यांना देय असलेला लाभार्थी हिस्सा भरला असून इतर ३९७ लाभार्थींनी यासंदर्भात उदासिनता दर्शविली आहे. त्यातही प्रत्यक्षात केवळ १६९ कृषीपंपच आतापर्यंत कार्यान्वित होऊ शकले, अशी माहिती सूत्रांनी दिली.सौर कृषीपंपाची योजना जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी सर्वार्थाने फायदेशीर आहे. शेतीला अखंडित तथा हक्काची वीज मिळण्यासोबतच वीज देयकांच्या खर्चातूनही शेतकर्यांना मुक्ती मिळणार आहे. विशेष म्हणजे लाभार्थींना केवळ ५ टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. असे असताना शेतकर्यांमधून या योजनेला प्रतिसाद मिळत नाही. - दत्तात्रय बनसोडे, अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम
सौर कृषीपंपाबाबत शेतकरी उदासिन!
By admin | Published: March 05, 2017 2:13 AM