वाशिम : घरची परिस्थिती हलाखीची, थाेडीफार शेती ती पण खडकाळ; परंतु मुलाला शिकविण्याची जिद्द असलेल्या माता-पित्यांनी रस्त्यावरील गिट्टी फाेडून आपल्या मुलास शिकविण्याचे कार्य केले. मुलालाही शिक्षणाची आवड असल्याने त्यानेही मोलमजुरी करून मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेऊन आपल्या आई -वडिलांची स्वप्नपूर्ती केली. त्याने चक्क एमपीएससी परीक्षेत यश प्राप्त न करता राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवून मानोरासारख्या दुर्गम भागाचा राज्यात नावलौकिक केला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेचा निकाल ४ जुलै सायंकाळी जाहीर झाला. यात वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या रंजितनगर लभाण तांड्यावरचा सुनील खचकड हा राज्यात प्रथम आला आहे. घरची परिस्थिती हालाखीची, मुक्त विद्यापीठातून झालेले शिक्षण, सतत दोनवेळा थोड्या मार्काने हुकलेली संधी अन् आता राज्यात प्रथम असा हा अत्यंत खडतर प्रवास सुनीलने आई-वडील आणि पत्नीच्या साथीने यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवला आहे. सुनीलचे आई- वडील रस्त्यावर गिट्टी फोडण्याचे काम करायचे. सुनीलनेही मोलमजुरी करून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए केलं.
घरची परिस्थिती बदलायची असेल तर नोकरी मिळवणं महत्त्वाचं आणि नोकरी मिळवायची असेल तर स्पर्धा परीक्षा हाच एकमेव मार्ग हे लक्षात घेऊन सुनीलने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सहा वर्षांपूर्वी संभाजीनगर गाठलं. महागडे क्लास लावणं शक्य नव्हतं म्हणून मित्रांच्या साथीने अभ्यास सुरू केला. दाेनदा अपयश आले; पण सुनील खचला नाही. त्यानं पुन्हा तयारी सुरू केली. वाढतं वय लक्षात घेऊन आता आई-वडील मात्र थांबायला तयार नव्हते, त्यांनी सुनीलचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०२० साली नांदेड जिल्ह्यातील आत्याच्या मुलीशी सुनीलचं लग्न ठरलं. ती धाराशिव जिल्ह्यात पोलिस दलात भरती झाली होती. कोणतीही नोकरी नसलेल्या सुनीलची मेहनत अन् अभ्यासावर विश्वास दाखवत उर्मिलाने लग्नाला होकार दिला आणि पुढील काळात पतीचं स्वप्न साकार करण्यासाठी त्याला आर्थिक आणि मानसिक पाठबळ दिलं.