लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्याच्या विविध भागात साेसाट्याच्या वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होऊन शुक्रवारी रात्री अवकाळी पाऊस व मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामुळे शेकडो एकरावरील बीजवाई कांदा, मूग, पपई, टरबूज, आंबा या पिकांचे अताेनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. गतवर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने शेतात सोंगून ठेवलेल्या व काही ठिकाणी काढणीच्या प्रतीक्षेत असलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याची भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. अशातच १९ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अचानक मेघ भरून येत ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. यादरम्यान, ताशी १०० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने सोसाट्याचा वारा सुटला व जोरदार गारपीट झाली. या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सर्वच तालुक्यांमधील शेकडो एकरावर बहरलेला बीजवाई कांदा क्षणात भुईसपाट झाला. यासह उन्हाळी मूग, पपई, टरबूज, आंबा व अन्य फळपिके, भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पुरते हतबल झाले असून महसूल व कृषी विभागाने नुकसानाचे तत्काळ सर्वेक्षण करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे विशेषत: उन्हाळी मूग, पपई, आंबा, टरबूज, भाजीपाला पिके व बीजवाई कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने सर्वेक्षण व नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. - शंकर तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी