तालुक्यात सर्वदूर खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली असून, शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खत, रासायनिक औषध खरेदी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. साधारणत: ७५ ते १०० मिलीमीटर पर्जन्यमान झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणीचे काम हाती घ्यावे, असे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात ९ जूनपर्यंतच ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, १० जूनलाही सर्वत्र धुवाधार पाऊस कोसळला. पुढील काही दिवस हे चित्र असेच कायम राहणार असून, अतिवृष्टीचे संकेत वर्तविण्यात येत आहेत. अशा स्थितीत पेरणीची घाई केल्यास बियाणे वाहून जाण्याचा धोका आहे. असे झाल्यास पेरणी उलटून शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया जाऊ शकतो. राज्यस्तरावरूनदेखील शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी १७ जूनपर्यंत पिकांची पेरणी न करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच पेरणीची कदापि घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
......................
तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस
मानोरा तालुक्यात १० जून रोजी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे अरुणावती नदीला पूर येण्यासह नदी-नाले, ओढे वाहते झाले आहेत. अनेकांच्या शेतात पावसाचे पाणी साचले आहे. अशात पेरणीची घाई केल्यास बियाणे वाहून जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांनी पेरणीबाबत सतर्क राहणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.