वाशिम जिल्ह्यात गतवर्षी सरासरीच्या तुलनेत खूप अधिक पाऊस पडला. त्यामुळे जलस्त्रोत काठोकाठ भरलेच शिवाय भूजल पातळीही वाढली. त्यामुळे विहिरी, कूपनलिकांत अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणी आहे. या पाण्याच्या भरवशावरच शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची पेरणी केली आहे. कृषी विभागाने यंदा ४५०० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी नियोजित केली होती. तर प्रत्यक्षात ८७४० हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली आहे. त्यात भुईमुगाचे नियोजित क्षेत्र २७०० हेक्टर असताना ४८८७.२० हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली आहे. ज्वारीचे नियोजित क्षेत्र ५०० हेक्टर असताना ५१४.८० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. मुगाचे नियोजित क्षेत्र ५०० हेक्टर असताना १९४९.१० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. सोयाबीन पिकाची ४४२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे, तर उडिदाची २२२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
------
मक्याचे क्षेत्र घटले
जिल्ह्यात उन्हाळ्यात सरासरी ५०५ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी अपेक्षित असते. त्यात यंदा पाणी उपलब्ध असल्याने या पिकाचे क्षेत्र वाढण्याची अपेक्षा होतील; परंतु शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग आणि उन्हाळी मुगाच्या पेरणीवर अधिक भर दिल्याने मका पिकाचे क्षेत्र घटले असून, जिल्ह्यात ३२७.६० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी होऊ शकली आहे.