वाशिम, दि. १२- जिल्ह्यात सोयाबीन सुड्यांना पेटवून दिले जात असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. मंगळवारच्या रात्रीदरम्यान रिठद व गोवर्धन येथे सोयाबीन सुडीला (गंजी) आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.रिठद येथील उद्धव जनार्दन आरू यांच्या शेतातील सोयाबीन सुडीला मंगळवारी रात्रीदरम्यान अचानक आग लागली. यामध्ये जवळपास ६0 ते ६५ पोत्यांचे सोयाबीन जळाल्याची तक्रार आरू यांनी नोंदविली. अडीच लाख रुपयांच्या वर नुकसान झाल्याने भरपाई मिळावी, अशी मागणी आरू यांनी केली. गत चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांनी सोयाबीन काढणीसाठी एकच लगबग केली आहे. पावसापासून बचाव म्हणून अनेक शेतकरी सोयाबीनची गंजी लावत आहेत. या गंजीला आग लावण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याने शेतकरी भयभीत झाले.दुस-या घटनेत गोवर्धन येथील गजानन किसन गवळी यांच्या तीन एकरातील सोयाबीन सुडीला अज्ञात इसमाने १0 ऑक्टोबरच्या रात्रीदरम्यान आग लावली. यामध्ये गवळी यांचे ३५ पोते सोयाबीनचे नुकसान झाले. प्रवीण केशवराव वाघ यांच्या मालकीची ३ एकरा जमीन गजानन किसन गवळी यांनी मक्त्याने (ठोक पद्धती) लागवडीस घेतली. सोयाबीन पिकाची कापणी करुन गंजी घातली असता अज्ञात इसमाने रात्री दरम्यान गंजीला आग लावली. यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
सोयाबीनच्या सुड्यांना आग; शेतकरी भयभीत
By admin | Published: October 13, 2016 1:59 AM