- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे सध्या विक्री करण्यासाठी सोयाबीनचा दाणाही शिल्लक राहिलेला नाही, शेकडो क्विंटल तूर व चणा मात्र पडून आहे. असे असताना सोयाबीनचे प्रतिक्विंटल दर सध्या आठ ते दहा हजारांवर पोहोचले असून तूर आणि हरभऱ्याचे प्रतिक्विंटल दर मात्र हमीपेक्षाही कमी झाले आहेत. या अजब परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.जिल्ह्यात पूर्वी खरीप हंगामात प्रामुख्याने कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतले जायचे. त्यापाठोपाठ, तूर, मूग, उडीद, ज्वारी या पिकांचा पेरा केला जायचा. मात्र, गेल्या काही वर्षांत अन्य सर्व पिकांच्या तुलनेत सोयाबीनचाच सर्वाधिक पेरा होत आहे. जून महिन्यात पेरणी केल्यानंतर साधारणत: सप्टेंबर महिन्यात उत्पादित सोयाबीन शेतकऱ्यांकडून बाजारपेठेत विक्रीसाठी नेले जाते. गतवर्षी सुरुवातीच्या काळात सोयाबीनला जास्तीत जास्त ३८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. त्यानंतर काहीच दिवसांत हे दर ४ ते ५ हजारांवर पोहोचले. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी घर व गोदामांमध्ये साठवून ठेवलेले सोयाबीन विकण्याची घाई केली. काही प्रमाणात शिल्लक असलेल्या सोयाबीनचा बियाणे म्हणून वापर करण्यात आला. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे विकण्याकरिता सोयाबीनच शिल्लक राहिलेले नाही. असे असताना सोयाबीनला सध्या ‘न भूतो न भविष्यती’, असा १० हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिकचा दर मिळत आहे.दुसरीकडे तूर आणि चना हा शेतमाल मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून पडून असताना गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये तूरीला ५४००; तर हरभऱ्या ३८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. जो हमीदरापेक्षाही कमी असल्याने माल विकावा किंवा नाही, या द्विधा मन:स्थितीत जिल्ह्यातील शेतकरी सापडले आहेत.
महिनाभरात १९ हजार क्विंटल सोयाबीन विक्रीवाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी सप्टेंबर महिन्यानंतर शेतकऱ्यांकडून दैनंदिन विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या सोयाबीनची विक्रमी आवक होते. साधारणत: नव्या वर्षातील फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून हे प्रमाण कमी होत जाते. दरम्यान, जुलै २०२१ मध्ये सोयाबीनच्या दराने उच्चांक गाठला. मात्र, अधिकांश शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक राहिले नाही. या महिन्यात वाशिमच्या बाजार समितीत सुमारे १९ हजार क्विंटल सोयाबीनची विक्री झाली. त्यातुलनेत २३ हजार ५४० क्विंटल तूर आणि १३ हजार ७६४ क्विंटल चणा विकला गेला.
गतवर्षी सोयाबीन हाती आल्यानंतर काहीच दिवसांत सोयाबीनचे दर पाच हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले होते. ते तुलनेने अधिक वाटल्याने सर्व सोयाबीन विक्री केले. आता तेच दर ८ ते १० हजार रुपयांवर पोहोचले असताना जवळ सोयाबीनचा दाणाही शिल्लक राहिलेला नाही.- राजेश कडू, शेतकरी, खानापूर