जिल्ह्यात गत खरीप हंगामात २ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. या पिकाची स्थिती उत्तम असताना परतीच्या पावसाने काढणी पश्चात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर दर्जाही खालावला. यानंतरही जिल्ह्यात सोयाबीनचे चांगले उत्पादन झाले. शासनाने या शेतमालास ३८८० रुपये प्रती क्विंटल हमीदर घोषित केले असताना सुरुवातीच्या काळात त्यापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जात होती; परंतु राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी वाढली. त्यामुळे स्थानिक बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी आली. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून सरासरी ४३०० ते ४४०० रुपये दराने सोयाबीनची खरेदी व्यापारी करीत आहेत. या आठवड्यातही सोयाबीनला सरासरी ४४५० रुपये दर मिळत आहेत. तथापि, या शेतमालाच्या मागणीत सतत होत असलेली वाढ लक्षात घेता शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री थांबविली आहे. यामुळेच बाजार समित्यात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.
-----------------------------------
सोयाबीनच्या आवकीची तुलनात्मक स्थिती
बाजार समिती १ जानेवारी - २२ जानेवारी
वाशिम ११००० ४१७५
कारंजा १५००० ४०००
मानोरा १३०० ९००
मंगरूळपीर ७५०० ३०००
रिसोड ४६०० २५००
-----------------------------------
कोट: बाजारात हमीदरापेक्षा जवळपास ५०० रुपये अधिक दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे. सोयाबीनच्या मागणीत वाढ असली तरी, दरात फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. पुढे महिनाभरही सद्य:स्थितीतील दर स्थिर राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जिल्ह्यात आता केवळ मोठ्या शेतकऱ्यांकडेच सोयाबीन उरले आहे.
-आनंद चरखा,
अध्यक्ष व्यापारी युवा मंडळ,
------------
कोट: गेल्या आठवडाभरापासून सोयाबीनचे दर स्थिर आहेत. अद्यापही सोयाबीनची खरेदी हमीपेक्षा अधिक दराने होत असली तरी, बाजाराची स्थिती पाहता पुढे सोयाबीनचे दर वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच आधी आर्थिक गरजा भागविण्यापुरते सोयाबीन विकले. आता रब्बीतील हरभराही काढणीवर येत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची प्रतीक्षा करीत आहोत.
-गजानन हळदे,
शेतकरी, इंझोरी