वाशिम : जिल्ह्यात जवळपास ३ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतले जाते. मागील २-३ वर्षांपासून सोयाबीन पिकाची उत्पादकता विविध कारणामुळे कमी होत आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे तांत्रिक बाबीची माहिती होऊन उत्पादन सोबतच उत्पन्न दुप्पट व्हावे या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र वाशिम द्वारे सोयाबीन पीक सुधारीत लागवड तंत्रज्ञान या विषयावर ऑनलाईन माध्यमातून ४ जून २०२१ रोजी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र वाशिम डॉ. रवींद्र काळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विषय तज्ज्ञ कृषिविद्या टी. एस देशमुख हे लाभले.
मार्गदर्शक सत्रात टी. एस देशमुख यांनी सुधारित सोयाबीन लागवड तंत्र याबद्दल मार्गदर्शन करताना सोयाबीन पीक अद्यावत संशोधनाची स्थिती व दिशा, लागवडीच्या विविध वाणाची वैशिष्ट्ये गुणधर्म, उत्पादकता व कीडरोग प्रतिकारकता या संदर्भात विशेष माहिती तसेच पीक लागवड तंत्रज्ञान व्यवस्थापनासाठी बियाण्याची निवड, उगवणशक्ती तपासणे, रासायनिक खते वापर, पूर्व मशागत, तण व्यवस्थापन, पीक संरक्षण इत्यादी महत्त्वाच्या बाबी याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र काळे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या विविध शाखांकडून प्रसारित अद्यावत सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढ तसेच पीक उत्पादनाच्या समस्यांवर मात करून शेतीतील उत्पन्न दुप्पट करावे असे आवाहन केले. सोयाबीन पिकामध्ये सर्व लागवडीपासून तर काढणीपर्यंत तांत्रिक बाबीचा अवलंब करावा अशी विनंती केली.
कार्यक्रमात सहभागी प्रयोगशील शेतकऱ्यांनी त्यांच्या सोयाबीन सुधारित वाण वापर अनुभव कथन केला. त्यानंतर तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कार्यक्रम सहाय्यक संगणक तज्ज्ञ एस. आर बावस्कर यांनी केले.