लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सोयाबीनचे दर दिवसेंदिवस वाढतच असून, सोमवारी बाजार समित्यांत व्यापाºयांकडून सोयाबीनला ३६०० रुपयांहून अधिक दर शेतकºयांना मिळाला. वाढत्या दरामुळे सोयाबीनची आवकही मोठ्या प्रमाणात होत असून, जिल्ह्यात सोमवारी वाशिम वगळता पाच बाजार समित्या आणि उपबाजार मिळून ३० हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती. त्यात कारंजा बाजार समितीतच ८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. शासनाने यंदा सोयाबीनला ३३९९ रुपये प्रति क्विंटलचे हमीभाव जाहीर केले आहेत, तर यंदा बाजारात व्यापाºयांनी सुरुवातीपासूनच सोयाबीनची चांगल्या दराने खरेदी सुरू केली होती. यंदाचे सोयाबीन बाजारात येण्यास सुरुवात झाल्यानंतर बाजार समित्यांत व्यापाºयांकडून प्रति क्विंटल सरासरी ३१०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत होते. त्यानंतर सोयाबीनचे राष्ट्रीय बाजारातील दर आणि मागणी वाढू लागल्याने स्थानिक बाजारातून सोयाबीनची उचल मोठ्या प्रमाणात सुरू झाली. या तेजीचा फायदा घेण्यासाठी व्यापाºयांनी सोयाबीनच्या दरात वाढ केली. सोमवारी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर बाजार समितीत सोयाबीनला ३६१५ रुपये प्रति क्विंटल, तर कारंजा येथील बाजार समितीत जास्तीतजास्त ३६७० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळाले. शासनाकडून जाहीर हमीभावाच्या तुलनेत व्यापाºयांनी दिलेले भाव हे २०० रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मानोरा या बाजार समित्यांसह शेलूबाजार आणि अनसिंग येथील बाजारांतही सोयाबीनला ३५०० रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळाले. गेल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात तेजी आल्याने शेतकºयांनीही सोयाबीनच्या विक्रीवर जोर देण्यास सुरुवात केल्यामुळे बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढत आहे. एकट्या कारंजा बाजार समितीत सोमवारी ८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली, तर इतर बाजार समित्या आणि उपबाजार मिळून ३० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली होती.
सोयाबीनची आवक वाढली; वाढत्या दराचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 4:26 PM