वाशिम : नवीन सोयाबीन बाजारामध्ये येताच बाजारभावात घसरण सुरूच असून, गत तीन दिवसात दीड हजाराने बाजारभाव कोसळले आहेत. बाजारभावातील घसरण पाहून शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
गतवर्षातील आर्थिक नुकसान विसरून यंदा नव्या उमेदीने शेतकरी शेतीच्या कामाला लागला. सोयाबीनला झळाळी मिळेल, या अपेक्षेने यंदा जिल्ह्यात सोयाबीनचा पेराही वाढला. दरवर्षी सरासरी तीन लाख ९० हजार हेक्टरच्या आसपास सोयाबीनचा पेरा असतो. यंदा चार लाखांचा टप्पा ओलांडला असून, बाजारभावही बऱ्यापैकी असल्याने ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. नवीन सोयाबीन बाजारामध्ये येण्यापूर्वी साधारणत: प्रतिक्विंटल ८,००० ते १०,००० रुपये दर होता. नवीन सोयाबीन बाजारामध्ये येण्याच्या पहिल्या दिवशी प्रतिक्विंटल ८,२५० रुपये दर मिळाला होता. त्यामुळे शेतकरीही सुखावला. मात्र, हा आनंद औटघटकेचा ठरला असून, त्यानंतर झपाट्याने बाजारभावात घसरण सुरू झाली. जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीमध्ये सोयाबीनसह अन्य शेतमालाला वेगवेगळे दर मिळतात. त्यामुळे सोयाबीनच्या दरातही तफावत दिसून येते. सोयाबीनच्या दरातील घसरण थांबली नसून, गत तीन दिवसात दीड हजाराने बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे यंत्रणेसमोर हतबल ठरलेल्या शेतकऱ्यांमधून ‘आता काय करावे?’ असा प्रश्न विचारला जात आहे.
.......
सोयाबीनच्या दरातील घसरण केव्हा थांबेल?
कोट
नवीन सोयाबीन बाजारामध्ये आले की दर कोसळतात, याचा अनुभव यावर्षीही शेतकऱ्यांना येत आहे. शेतमालाच्या किमती वगळता खते, बियाणे, कीटकनाशके, मजुरीच्या खर्चात प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे शेती कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
- बाळासाहेब खरात
प्रगतशील शेतकरी, पळसखेडा
..........
कधी नैसर्गिक तर कधी मानवी संकटापुढे शेतकरी हतबल ठरत आहे. यंदा सोयाबीनला बऱ्यापैकी भाव मिळेल, अशी अपेक्षा असतानाच आता बाजारभाव कोसळत असल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग होत आहे. दरातील घसरण केव्हा थांबणार?
- रमेश अंभोरे, शेतकरी, चिखली
........
एकीकडे शेती लागवडीच्या खर्चात भरमसाठ वाढ होत आहे तर दुसरीकडे शेतमालाच्या किमतीत किंचितशी वाढ होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. सोयाबीनच्या दरात घसरण सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.
- महादेव सोळंके, शेतकरी, नागठाणा