वाशिम जिल्ह्यात गतवर्षी ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आल्याने उत्पादनात घट आली. राज्यभरात आणि देशातही अशीच स्थिती असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या ब्राझील, अमेरिका, अर्जेंटिना, घाणा आणि चीनसह इतर काही देशांतही सोयाबीनचे उत्पादन घटले. त्यामुळे सोयाबीनच्या मागणीत अचानक वाढ झाली. त्यामुळेच जिल्ह्यात पाहता-पाहता सोयाबीनचे दर ४ हजार रुपये प्रतिक्विंटलहून १० हजार ८५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले. प्रत्यक्षात या दरवाढीचा शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नाही. तथापि, स्थानिक व्यापाऱ्यांनी सुरुवातीला काही प्रमाणात सोयाबीन खरेदी करून ठेवले. त्यांचा थोडाफार फायदा झाला, तर शेकडा दोन ते पाच टक्के शेतकऱ्यांना सोयाबीनच्या सर्वोच्च दराचा लाभ चांगलाच झाला. आता मात्र सोयाबीनचे दर घसरू लागले आहेत. कारंजा, मंगरुळपीर, रिसोडसह मानोरा बाजार समितीमधील मंगळवारच्या खरेदीवरून सोयाबीनचे दर २० हजारांनी घसरल्याचे दिसून आले.
---------------------
आता पुढच्या हंगामाकडे लक्ष
यंदाचे सोयाबीन बाजारात दाखल होण्यास अद्याप दीड महिन्यापेक्षा अधिक वेळ असताना आतापासूनच सोयाबीनचे दर घसरू लागले आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीयस्तरावर सोयाबीनला मागणी होत असताना शासनाने सोयाबीन आयात करण्यास परवानगी दिली आहे. आता पुढील हंगामात सोयाबीनची स्थिती कशी राहते याकडे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
---------------------