जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत गुंंतला आहे. त्यामुळे या शेतमालाची आवकही बाजार समित्यांत घटत असल्याचे दिसत आहे.
गत काही महिन्यांपासून सोयाबीन आणि तुरीसह सर्वच शेतमालाच्या दरात तेजी सुरू होती. सोयाबीनच्या दराने, तर यंदा विक्रमी उच्चांक गाठत ७५०० पर्यंत झेप घेतली होती. तुरीचे दरही आठ हजारांच्या घरात पोहोचले होते. त्यामुळे या शेतमालाच्या विक्रीवर शेतकऱ्यांनी भर दिला होता. त्यामुळे बाजारात या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होती. अमेरिका, ब्राझील, चीनसारख्या देशांकडून सोयाबीनची मागणी वाढल्याने देशांतर्गत सोयाबीनचा उठाव वाढून या शेतमालाचे दर वाढले होते. अद्यापही सोयाबीनच्या दरातील तेजी कायम असून, शुक्रवारी वाशिम बाजारात अधिकाधिक ८४०० रुपये प्रति क्विंटलने सोयाबीनची खरेदी झाली, तर मंगरुळपीर बाजार समितीत ७८०० रुपये प्रति क्विंटलने सोयाबीनची खरेदी झाली. कारंजा बाजार समितीत मात्र सोयाबीनचे दर सात हजारांच्या खाली घसरून प्रति क्विंटल ६९०० रुपयांवर आले होते. त्यातच शेतकरी खरीप हंगामात व्यस्त असल्याने या शेतमालाची आवकही घटल्याचे बाजार समितीच्या आकडेवारीवरून दिसले.
--------------------
आठवडाभरात ५०० रुपयांची घट
जिल्ह्यात गत काही दिवसांत ७८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत सोयाबीनचे दर पोहोचले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घरात राखून ठेवलेले सोयाबीनही बाजारात विकण्यावरच भर दिला. अद्यापही या शेतमालाच्या दरात तेजी आहे; परंतु कारंजा बाजारात चालू आठवड्यात चारच दिवसांत या शेतमालाचे दर ५०० रुपयांनी घसरल्याचे कारंजा बाजार समितीकडून शुक्रवारी प्राप्त माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
^^^^^