शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटांतून जावे लागते. शेतमाल घरी आल्यानंतर विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतमाल विक्री करावा लागतो. अल्प भूधारक शेतकरी तर शेतमाल तयार झाला की बाजार समितीत विक्रीसाठी आणतो. मध्यम व श्रीमंत वर्गातील काही शेतकरी भाववाढ होईल, या अपेक्षेने पाच ते सहा महिने सोयाबीनची विक्री थांबवू शकतात. ऐन हंगामात सोयाबीनला २,६०० ते ३,८०० या दरम्यान प्रति क्विंटल दर असतात. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांना अल्पदरात सोयाबीनची विक्री करण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो. सोयाबीनचा हंगाम संपल्यानंतर जवळपास ८ महिन्याने बाजारभाव वाढले आहेत. जुलै महिन्यात सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल १० हजारावर पोहोचले होते. १५ ऑगस्ट दरम्यान बाजारभावात दोन हजाराने घसरण झाली. आता पुन्हा सोयाबीनला झळाळी मिळत असल्याचे दिसून येते. मंगळवार, २४ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल ७,६००-९,३५० दरम्यान भाव मिळाला.
०००००
शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना फायदा !
सोयाबीनचा बाजारभाव ऐन हंगामात गडगडतो. दर वाढले असले, तरी सध्या बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन नाही. त्यामुळे या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक होत आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.