वाशिम : नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभाव गडगडत आहेत. यामध्ये आणखी घट येत असून, शनिवार, १८ सप्टेंबर रोजी वाशिमच्या बाजार समितीत नवीन सोयाबीनला ५५०० ते ७२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. जुन्या सोयाबीनचा दरही कोसळला असून, ६०००-७४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटांतून जावे लागते. नैसर्गिक आपत्तीपासून बचावलेला शेतमाल चिखलमय रस्त्याने घरी आणताना शेतकऱ्यांची दमछाक होते. शेतमाल घरी आला की बाजारभाव गडगडतात. १५ दिवसांपूर्वी जुन्या सोयाबीनला १० हजारांवर भाव होता. त्यानंतर बाजारभाव गडगडत असल्याचे दिसून येते. नव्या सोयाबीनला तर अल्प भाव मिळत असल्याचे दिसून येते. ४ सप्टेंबरला नव्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ६७०० ते ८२८१ रुपये भाव मिळाला होता. आता बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन येत असल्यामुळे बाजारभावही कोलमडत असल्याचे दिसून येते. शनिवारी वाशिम बाजार समितीत नवीन सोयाबीनची २७७५ क्विंटल आवक होती. या सोयाबीनला प्रतिक्विंटल ५५००-७२०० भाव मिळाला. जुन्या सोयाबीनची आवक ३७९ क्विंटल होती, तर प्रतिक्विंटल भाव ६०००-७४०० होता. यावरून सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड घट येत असल्याचे दिसून येते. बाजारभाव गडगडत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
.....................
भाव आणखी गडगडणार
नवीन सोयाबीन बाजारात येत असल्याने भाव आणखी गडगडण्याची शक्यता व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. एकीकडे रासायनिक खते, बियाणे, मजुरी आदींचा खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे हमीभावात फारशी वाढ होत नसल्याचे दिसून येते. १५ दिवसांनंतर सोयाबीनचा बाजारभाव ३५०० ते ६००० रुपयापर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
..................
सांगा, शेतकऱ्यांनी शेती कशी करावी?
कोट
लागवड खर्चात एकीकडे भरमसाठ वाढ होत आहे, तर दुसरीकडे शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नाहीत. १५ दिवसांपूर्वी सोयाबीन तेजीत होते. आता नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो.
- हरीश चौधरी
शेतकरी, पार्डीटकमोर
...................
भारतात मुबलक प्रमाणात शेतमाल उपलब्ध असताना बाहेरील देशातून शेतमाल आयात करण्याला केंद्र सरकार परवानगी देते. त्यामुळे देशातील शेतमालाला चांगला बाजारभाव कसव मिळेल? सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणांचा फटका कोट्यवधी शेतकऱ्यांना बसत आहे.
- गजानन गोटे,
शेतकरी, तोंडगाव