अकोला : सतत दोन वर्षापासून सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच येत असून, उत्पादन आणि सोयाबीनचा उतारा कमी झाल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत हमीभाव शेतकर्यांना तारतील, अशी अपेक्षा होती; परंतु हमीभावातही यावर्षी वाढ झाली नसून, बाजारपेठेत सोयाबीनचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.गतवर्षी अतवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले. यावर्षी पाऊसच नसल्याने त्याचा फटका सोयाबीनला बसला. गतवर्षी सोयाबीन काळे पडल्याने, यावर्षी बियाण्यांसाठीही शेतकर्यांना संघर्ष करावा लागला. कसेबसे मिळालेले बियाणे मोठय़ा प्रमाणात वांझ निघाल्याने शेतकर्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. किटकनाशकांच्या फवारणींचा अतिरिक्त खर्चही वाढला. त्या तुलनेत उत्पादन मात्र झाले नाही. किमान उत्पादन खर्च तरी निघेल, या अपेक्षेत शेतकरी असताना, बाजारपेठेत सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल २५00 ते २९00 रूपयांपेक्षा जास्त सरकत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी पाऊस नसल्याने सोयाबीन परपिक्वतेपूर्वीच वाळले आहे. त्यामुळे सोयाबीन शेंगाची वाढ खुंटली. त्याच आधारावर व्यापार्यांकडून शेतकर्यांच्या सोयाबीनची लूट सुरू आहे. एकीकडे सोयाबीन उत्पादन कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, दुसरीकडे बाजारात भाव पडले आहेत. या चक्रामुळे शेतकरी संभ्रमात सापडला आहे. सतत दोन वर्षाच्या नुकसानामुळे यावर्षी सोयाबीन घरी साठवून ठेवण्यासारखी शेतकर्यांची परिस्थितीच नाही. त्यामुळे शेतात काढलेले सोयाबीन थेट बाजारात विक्रीसाठी जात असून, त्याचे परिणाम पुढील वर्षीही जाणवणार आहेत. हमीभावाने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. गतवर्षीपर्यंत सोयाबीनच्या हमीभावात वाढ करण्यात आली; परंतु यावर्षी वाढच झाली नसल्याने सोयाबीनचे हमीभाव प्रति क्विंटल २५६0 रूपयांवर स्थिरावले आहे. त्याचाही फटका शेतकर्यांना सोसावा लागत आहे.
सोयाबीनचे भाव गडगडले!
By admin | Published: October 29, 2014 10:44 PM