लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम ऐन तोंडावर असताना सोयाबिन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मध्यप्रदेशातील ज्या जिल्ह्यांमधून बियाणे उपलब्ध होते, ते जिल्हेच ‘लॉकडाऊन’मुळे बंद असल्याने ही परिस्थिती उद्भवली असून १७ मे नंतरच हा तिढा सुटू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात २५ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाऊन लागू असून त्याचा शेती क्षेत्राला बराच मोठा फटका बसला आहे. तथापि, अत्यावश्यक सेवांसह कृषीविषयक कामांना संचारबंदीतून बहुतांशी शिथिलता देण्यात आली असून रेल्वेव्दारे माल वाहतूक देखील केली जात आहे. असे असले तरी मध्यप्रदेशातील इंदौर, उज्जैन, खंडवा या ज्या जिल्ह्यांमधून वाशिम जिल्ह्यात सोयाबिनसह इतर बियाणे येते, ते जिल्हेच सद्या ‘लॉकडाऊन’च्या कचाट्यात अडकले असून पुरेसे मजूर, कामगारांअभावी बियाणे निर्मिती व वाहतूक प्रभावित झाली आहे. परिणामी, वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सोयाबिनचे बियाणे येणे बंद झाले आहे. येत्या १७ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ कायम राहणार असून किमान तोपर्यंत तरी हा तिढा सुटण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकºयांनी घरच्याच बियाण्याची यंदा पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. त्यानुषंगाने तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायकांच्या माध्यमातून गावोगावी बैठका घेऊन जनजागृती केली जात असल्याचे दिसून येत आहे. खताचाही जाणवणार तुटवडा!जिल्ह्यात आतापर्यंत दरवर्षीच्या तुलनेत सुमारे ५० टक्के खतविक्री झालेली आहे; मात्र यापुढे खताचा देखील तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी ठराविक एकाच कंपनीच्या खताचा आग्रह न धरता विद्यापिठाच्या शिफारशीनुसार इतर खतांचाही वापर शेतीसाठी करावा. ऐन खरीप हंगामात खत खरेदी न करता आताच हळूहळू का होईना कृषी निविष्ठांची जमवाजमव करून ठेवावी, असे आवाहन वाशिमचे तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी केले आहे.
वाशिम जिल्ह्यात सोयाबिन बियाण्याचा तुटवडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 5:54 PM