वाशिम : जवळपास ९५ टक्के शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीन संपले आहे. बाजार समित्यांमधील आवकही घटली आहे. अशा परिस्थितीत आता सोयाबीनला झळाळी मिळत असून, सोमवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल नऊ हजारांवर दर मिळाला. या वाढीव दराचा फायदा काय, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.
शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटांतून जावे लागते. शेतमाल घरी आल्यानंतर विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतमाल विक्री करावा लागतो. अल्प भूधारक शेतकरी तर शेतमाल तयार झाला की, बाजार समितीत विक्रीसाठी आणतो. मध्यम व श्रीमंत वर्गातील काही शेतकरी भाववाढ होईल या अपेक्षेने पाच ते सहा महिने सोयाबीनची विक्री थांबवू शकतात. ऐन हंगामात सोयाबीनला २६०० ते ३६०० या दरम्यान प्रतिक्विंटल दर असताे. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांना अल्पदरात सोयाबीनची विक्री करण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो. सोयाबीनचा हंगाम संपल्यानंतर ७ ते ८ महिन्यांनी बाजारभाव वाढताे. याचा अनुभव दरवर्षीच शेतकऱ्यांना येतो. यंदाही जून महिन्यापासून सोयाबीनचे दर विक्रम प्रस्थापित करीत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवार, २६ जुलै रोजी सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल नऊ हजारांवर पोहोचला. मात्र, ९५ टक्के शेतकऱ्यांच्या घरात सध्या सोयाबीन नसल्याने या वाढीव दराचा शेतकऱ्यांना फारसा लाभ होणार नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.
----------------------------शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना फायदा !
कोट
सोयाबीनच्या ऐन हंगामात बाजारभाव गडगडतात. याचा अनुभव दरवर्षीच शेतकऱ्यांना येतो. दर वाढले असले तरी सध्या बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन नाही. त्यामुळे या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक होईल.
- पांडुरंग सोळंके,
प्रगतिशील शेतकरी
--------------------------सोयाबीनचा दर आता नऊ हजारांवर गेला आहे; परंतु याचा फायदा अल्पभूधारक व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना काहीच नाही. सोयाबीनचा शेतमाल तयार झाल्यानंतर प्रतिक्विंटल सहा ते आठ हजारांदरम्यान दर असणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे.
- संजयकुमार सरनाईक,
प्रगतिशील शेतकरी
---------------------------सोयाबीन घरात आल्यानंतर शेतमालाच्या दरात तेजी आल्यास याचा सर्वाधिक लाभ शेतकऱ्यांना होईल. मात्र, ऐन हंगामातच सोयाबीनला तीन ते साडेतीन हजारांदरम्यान दर मिळताे. गरज म्हणून अनेक शेतकऱ्यांना अल्प भावात सोयाबीन विकावे लागते.
- रमेश अवचार,
प्रगतिशील शेतकरी