वाशिम: गत काही महिन्यांपासून सतत होत असलेली सोयाबीन, तुरीची दरवाढ आता थांबली असून, या शेतमालाच्या दरात घसरण होत आहे. त्यात
जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत गुंंतला आहे. त्यामुळे या शेतमालाची आवकही बाजार समित्यांत घटत असल्याचे दिसत आहे.
गत काही महिन्यांपासून सोयाबीन आणि तुरीसह सर्वच शेतमालाच्या दरात तेजी सुरू होती. सोयाबीनच्या दराने, तर यंदा विक्रमी उच्चांक गाठत ७,५०० पर्यंत झेप घेतली होती. तुरीचे दरही आठ हजारांच्या घरात पोहोचले होते. त्यामुळे या शेतमालाच्या विक्रीवर शेतकऱ्यांनी भर दिला होता. त्यामुळे बाजारात या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होती. अमेरिका, ब्राझील, चीनसारख्या देशांकडून सोयाबीनची मागणी वाढल्याने देशांतर्गत सोयाबीनचा उठाव वाढून या शेतमालाचे दर वाढले होते. आता सोयाबीनसह तुरीच्या दरात घसरण सुरू झाली असून, जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी या दोन्ही शेतमालाचे दर सात हजारांच्या खाली घसरले होते. सोयाबीनचे दर ६,९०० रुपये प्रति क्विंटल, तर तुरीचे दर ६,५०० पर्यंत घसरले होते. त्यातच शेतकरी खरीप हंगामात व्यस्त असल्याने या शेतमालाची आवकही घटल्याचे बाजार समित्यांच्या आकडेवारीवरून दिसले.
--------------------
आठवडाभरात ५०० रुपयांची घट
जिल्ह्यात गत काही दिवसांत ७,८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत सोयाबीनचे दर पोहोचले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घरात राखून ठेवलेले सोयाबीनही बाजारात विकण्यावरच भर दिला. आता मात्र, या शेतमालाच्या दरात सतत घसरण सुरू असून, चालू आठवड्यात चारच दिवसांत या शेतमालाचे दर ५०० रुपयांनी घसरल्याचे कारंजा बाजार समितीकडून शुक्रवारी प्राप्त माहितीवरून स्पष्ट झाले आहे.