लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनच्या दरातील तेजी कायम आहे. शासनाने सोयाबीनला जेमतेम ३,८८० रुपये प्रती क्विंटलचे दर घोषित केले असताना जिल्ह्यातील बाजारात सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्यात रिसोड आणि मंगरुळपीर बाजार समितीत सोयाबीनला प्रती क्विंटल साडे पाच हजारांच्यावर दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.गतवर्षी जिल्ह्यात सोयाबीन काढणीवर असतानाच अवकाळी पावसाचा या पिकाला फटका बसल्याने हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनातही घट आली. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. त्यात सुरुवातीच्या काळात बाजार समित्यांत अल्पदराने सोयाबीनची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले. दरम्यान, ब्राझील, अमेरिकेसारख्या सोयाबीन उत्पादक देशातही या शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. त्यामुळे सोयाबीनच्या मागणीत आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढ झाली. चीनकडूनही सोयाबीनची मागणी होत असल्याने देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी येऊ लागली. याचा परिणाम विदभार्तील बाजारात दिसून येऊ लागला. त्यात वाशिम जिल्ह्यातील बाजारातही सोयाबीनच्या दराने उच्चांक गाठला असून, बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार ५०० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. मंगरुळपीर आणि रिसोड येथील बाजार समितीत गेल्या पाच दिवसांपासून सोयाबीनला प्रती क्विंटल साडे पाच हजारांपेक्षा अधिक दर मिळत आहेत.
रिसोड बाजार समितीत सर्वाधिक दरवाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपयांहून अधिक झाले आहेत. गुरुवारी बाजार समितीकडून प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी कमाल ५,६०० रुपये प्रति क्विंटल, तर मंगरुळपीर बाजार समितीत कमाल ५,५४० रुपये प्रती क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी झाली. जिल्ह्यातील इतरही बाजार समित्यांत सोयाबीनचे दर साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच होते.