वाशिम : जात पडताळणीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी २ जून पासून तीन दिवस विशेष मोहिम राबविण्यात येणार असून, यामध्ये सुरूवातीचे दोन दिवस विद्यार्थ्यांच्या अर्जांचा निपटारा तर ५ जून रोजी निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे अर्जांवर विचार केला जाणार आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दाखल झालेल्या अर्जांपैकी मागील सहा महिन्यात ८२४८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. सध्या समितीकडे २०३९ प्रकरणे सबळ पुराव्या अभावी प्रलंबित आहेत. याप्रकरणी सर्व संबंधित अर्जदारांना मोबाईल व एसएमएसद्वारे त्रुटीबाबत कळविण्यात आले आहे. तथापि, अनेक अर्जदारांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. ज्या अर्जदारांना समितीकडून संदेश मिळाला नाही, अशी सर्व प्रकरणे मार्गी लावण्यासाठी २ जून ते ५ जून २०१८ या कालावधीत समितीमार्फत विशेष निपटारा मोहीम राबविण्यात येणार आहे. याकरिता ३ जून २०१८ रोजी कार्यालय सुरु राहणार असल्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे सांगण्यात आले. २ जून, ३ जून व ५ जून २०१८ रोजी विद्यार्थी प्रकरणातील अर्जदारांनी संपर्क साधणे आवश्यक आहे. तसेच ४ जून २०१८ रोजी सेवा आणि निवडणूक जिंकलेल्या अर्जदारांनी संपर्क साधणे आवश्यक आहे. समितीद्वारे सर्व प्रलंबित प्रकरणी मोबाईलवर सदर निपटारा मोहिमेचे संदेश देण्यात येत आहेत. सर्व अर्जदारांनी आपल्याजवळील सर्व सबळ पुराव्यासह समिती कार्यालयाशी संपर्क साधावा आणि विशेष निपटारा मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले.