वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष अभियान हाती घेतले असून, शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’ लावून धोक्याचा इशारा देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी शौचालय बांधकामांना गती देणे यासाठी जिल्हा परिषदेतर्फे संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सामुहिक माध्यमातून गावोगावी भेटी देऊन शौचालय नसलेल्या कुटुंबियांशी संवाद साधणे आणि शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन करणे, असा हा उपक्रम सुरू आहे. वारंवार सूचना, विनंती करूनही शौचालय न बांधणाºया नागरिकांच्या घरावर आता ‘लाल स्टिकर’ लावून निर्वाणीचा इशारा दिला जात आहे. आता काही मोजक्या नागरिकांनी वैयक्तिक शौचालय बांधकाम केले नसल्याने गाव हगणदरीमुक्त होणार नाही. पर्यायाने शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीपासून त्या-त्या गावांना वंचित राहण्याची वेळ येऊ शकते, याची माहिती गावपातळीवर दिली जात आहे. स्वच्छता राखणे, महिलांची प्रतिष्ठा जपणे आणि गावविकासासाठी शासनाचा लाखो रुपयांचा निधी मिळविणे आदीसंदर्भात जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा स्वच्छता व पाणी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, नितीन माने पाटील आदींनी केले आहे.
गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे विशेष अभियान ; शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 2:15 PM
वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष अभियान हाती घेतले असून, शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’ लावून धोक्याचा इशारा देण्यात येत आहे.
ठळक मुद्दे जनजागृतीवर भर संपर्क अभियान राबविण्यात येत आहे