वाशिम : गत काही दिवसांपासून केरळ राज्यात दैनंदिन बाधित आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढलेला आहे. ‘ओणम’ या उत्सवामुळे होणाऱ्या गर्दीचा हा परिणाम मानला जात असून आपल्या भागातही आगामी काळात दहीहंडी, गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यात ‘टेस्टिंग‘ आणि ‘ट्रेसिंग’वर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांनी २८ ऑगस्ट रोजी दिली.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता बहुतांशी नियंत्रणात आहे. दैनंदिन नव्याने बाधित आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा परिणामकारक घटला असून परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे. दरम्यान, केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्येही असेच आशादायक वातावरण निर्माण झाले होते; मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्याठिकाणची स्थिती पुन्हा बदलली असून दैनंदिन कोरोनाने बाधित आढळणाऱ्यांचा आकडा अचानक मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ‘ओणम’ या उत्सवामुळे ठिकठिकाणी गर्दी होत असल्याचा हा परिणाम मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर अत्यंत सतर्क राहणे आणि सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. सोबतच कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे आणि इतर उपाययोजनांची चोख अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले आहेत. त्यानुषंगाने जिल्हास्तरावर आरोग्य यंत्रणा संपूर्ण तयारीनिशी सज्ज असून आगामी काळात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासोबतच बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम युद्धस्तरावर राबविण्यात येईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. राठोड यांनी सांगितले.
...............
कोट :
जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट उद्भवल्यास बाधितांवर उपचारासाठी ६०० बेडची सुविधा उभारण्यात आलेली आहे. ‘ऑक्सिजन’ आणि ‘व्हेंटिलेटर’ही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. आरोग्य विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना तिसरी लाट हाताळण्यासंबंधी प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे आधीच्या दोन लाटांप्रमाणे आरोग्य यंत्रणेवर विशेष ताण येणार नाही, असा आशावाद जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांनी व्यक्त केला.