वाशिम : परवानाधारक रिक्षाचालकांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळावा, याकरिता सदोष आधारकार्डात दुरुस्ती करण्यासाठी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात विशेष सुविधा उपलब्ध केली आहे.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परवानाधारक रिक्षाचालकांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार असून, याकरिता ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. याकरिता संगणकीय कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे. सदर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्जदाराचा मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न (लिंक) असणे अनिवार्य आहे.
ज्या अर्जदारांचा मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न नाही, अशा अर्जदारांच्या आधारकार्डमध्ये आवश्यक दुरुस्ती करून मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे. परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी आपला मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न करून घेण्यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंतच्या वेळेत वाशिम उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले.