वाशिम - गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, ३१ आॅक्टोबर रोजी वाशिम तालुक्यातील पाच गावांना जिल्हा परिषदेच्या चमूने भेटी देत कुटुंबियांशी संवाद साधला.
वाशिम जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी तसेच नागरिकांना शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले. लोटाबहाद्दरांविरूद्ध दंडात्मक कारवाई करतानाच, नागरिकांची मानसिकता बदलविण्यासाठी लोककलावंतांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. आता लोकसंख्येने मोठ्या असलेल्या व हगणदरीमुक्त घोषित न झालेल्या गावांत प्रत्येक कुटुंबांशी संवाद साधता यावा, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या संकल्पनेतून विशेष कुटुंब संपर्क अभियान राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत ३१ आॅक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम तालुक्यातील जयपुर, वारला, उमराळा, वाई अनसिंग या गावांना भेटी देण्यात आल्या. शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरी भेटी देऊन शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शौचालय नसलेल्या कुटुंबाच्या घरावर लाल रंगाचे (खतरा/धोका) स्टिकर लावण्यात आले. संबंधित कुटुंबाकडून शौचालय बांधकाम करण्याचे आश्वासन घेण्यात आले. शौचालय नसलेल्या घरासमोर घोषणा देऊन, गाणी गाऊन, मुंबई पोलीस अधिनियमाची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती किसनराव मस्के, गटविकास अधिकारी वाघ यांच्यासह जिल्हा स्वच्छता मिशन कक्षाच्या चमूची उपस्थिती होती.