वाशिम : कारंजा आणि वाशिम येथे स्त्री रुग्णालय, उपनिबंधक कार्यालये, न्यायालयीन कर्मचारी निवासस्थान यासह इतर कोट्यवधी रुपयांची विकासकामे सद्या प्रगतीपथावर असून यामुळे जिल्हा विकासाला गती मिळत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा निर्मितीला १७ वर्षाचा मोठा काळ लोटला आहे. यादरम्यान वाशिम या जिल्हा मुख्यालयस्थळी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधिक्षक कार्यालय, भव्य न्यायालयीन इमारत यासह इतरही प्रशासकीय कार्यालयांची उभारणी झाली. सद्य:स्थितीत वाशिम येथे भव्य स्वरुपात १०० खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी २० कोटी रुपयाचा निधी मंजूर असून आतापर्यंत १० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मार्च २०१६ पर्यंत हे स्त्री रुग्णालय महिला रुग्णांच्या सेवेत कार्यान्वित होणार आहे. कारंजा लाड येथेही स्त्री रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे. कारंजा, शिरपूर आणि रिसोड येथे १ कोटी १० लक्ष रुपये खर्चून उपनिबंधक कार्यालये उभारली जात आहेत. मानोरा येथे न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधून तयार आहेत. लवकरच या निवासस्थानांचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागील परिसरात जिल्हा शल्य चिकित्सकासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांकरिता कोट्यवधी रुपये खर्चून निवासस्थान उभारण्यात आलीे. काही किरकोळ बाबींमुळे त्याचा वापर सुरु झालेला नाही. मात्र, या इमारतींमध्ये लवकरच नर्सिंग कॉलेज सुरु होणार असून त्यात प्रवेश घेणाऱ्या मुलींकरिता वसतिगृहांची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय वाशिम येथील सिव्हिल लाईन भागात २ व्हीआयपी सुट आणि ४ सर्वसाधारण सुटचे भव्य विश्रामगृह उभारण्याचे कामही सद्या प्रगतीपथावर आहे. यासाठी शासनाने २ कोटी रुपयाचा निधी दिला आहे. कोषागार विभागाकरिता देखील नवीन इमारत उभारण्यात येणार असून तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. एकूणच जिल्ह्यात सुरु असलेल्या तद्वतच प्रगतीपथावर असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांमुळे जिल्ह्याच्या रखडलेल्या विकासाला गती मिळत असल्याचे दिसून येत असून यामुळे जिल्हावासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
वाशिम जिल्हा विकासाला मिळतेय गती
By admin | Published: August 07, 2015 1:19 AM