लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरात बहुतांश शाळा मुख्य रस्त्याला लागूनच आहेत. शाळा भरताना आणि सुटल्यानंतर सुसाट वेगाने धावणाºया वाहनांच्या गराड्यातूनच विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे मात्र अपघातांची भिती कायमची लागून राहत असल्यने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात सापडत आहे. असे असताना शाळा प्रशासन आणि शहर वाहतूक विभागाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वाशिम शहरात राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाला अगदी लागूनच आहे. या चौकातून चारही बाजूंनी दैनंदिन सुसाट वेगाने वाहने धावत असतात. श्री शिवाजी विद्यालय आंबेडकर चौक ते पाटणी चौक या शहरातील मुख्य मार्गावर आहे. श्री बाकलीवाल विद्यालय हे रिसोड नाका ते गोपाल टॉकीज मार्गावर; तर एस.एम.सी. इंग्लिश स्कुल वाशिम-रिसोड मार्गाच्या कडेला वसलेले आहे. राजस्थान आर्य महाविद्यालय हे अकोला नाका ते काटा या रस्त्यावर आहे. नमूद सर्वच मार्ग आणि रस्त्यांवरून दैनंदिन लहान-सहान वाहनांसह जडवाहतूकही होते. शाळा भरताना आणि सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीतच ठेवावा लागत असल्याची एकंदरित स्थिती निर्माण झाली आहे. असे असताना एकाही शाळेनजिक आतापर्यंत वाहतूक विभागाने एखादा कर्मचारी नियुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. वाशिम शहरातील प्रत्येक शाळेच्या प्रशासनानेही याप्रती गाफील भूमिका अंगीकारली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कुठल्याच ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. वाशिम शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांशी चर्चा करण्यासह लवकरच प्रत्येक शाळेजवळ सकाळी आणि सायंकाळी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसोबतच चिडिमारीसारखे प्रकार घडत असल्यास त्यावरही नियंत्रण ठेवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील.- राजू वाटाणेनिरीक्षक, शहर वाहतूक विभाग, वाशिम शहरातील रस्त्यांच्या कडेला वसलेल्या शाळांनजिक सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही वेळी वाहनांचे नियमन करण्यासाठी वाहतूक विभागाचा कर्मचारी नियुक्त असणे गरजेचे आहे. यासह शाळा प्रशासनानेही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष पुरवायला हवे. यासंदर्भात नगर परिषदेकडून संबंधितांना तशा सूचना दिल्या जातील. - अशोक हेडानगराध्यक्ष, नगर परिषद, वाशिम
सुसाट वेगातील वाहनांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 3:50 PM