वाशिम: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आयोजित ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहांच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनीचा समारोप ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आला. गुरुवार २९ मार्चपासून आयोजित या प्रदर्शनीला जिल्हाभरातील जनतेचा उत्स्फू र्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनीत स्वंयसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या या तीन दिवशीय प्रदर्शनीच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार मीना, तर प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, आर-सेटीचे संचालक प्रदीप पाटील, नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक विजय खंडरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन एस. माने आदिंची उपस्थिती लाभली होती. स्वंयसहाय्यता समुहांच्या वस्तूंची विक्री आणि प्रदर्शनी करण्यासाठी आयोजित या प्रदर्शनीत जिल्हाभरातील ७६ समुहांनी सहभाग नोंदविला. या प्रदर्शनीत हस्तकला वस्तू, खाद्य पदार्थ, साड्या, मसाले पदार्थ, पापड, लोणचे, विविध डाळी, लोकरी पासून बनविलेले साहित्य, विविध खाद्य पदार्थ यासह इतर उत्पादनांचे स्टॉल थाटण्यात आले होते. त्यामुळे स्वयंसहाय्यता समूहांची उत्पादने एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळाली. जुनी जिल्हा परिषद परिसरात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने आयोजित ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले होते. या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सभापती पानुताई जाधव, अतिरिक्त मुख कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन माने आदी उपस्थित होते.