वाशिम : कोरोनाच्या सावटातून सावरत जिल्ह्यातील जवळपास ५० खेळाडू विविध स्पर्धेत राज्य, राष्ट्रीयस्तरावर झळकले, तर यश इंगोले या युवकाने किलीमांजारो या शिखरावर राष्ट्रध्वज फडकावून देशाची मान उंचावली.
हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. गत दीड वर्षांपासून कोरोनामुळे क्रीडा स्पर्धादेखील प्रभावित झाल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने बॉस्केटबॉल, फुटबॉल, कुस्ती, तिरंदाजी, रायफल शूटिंग यासारख्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या विविध स्पर्धांमध्ये जवळपास ५० खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर झळकले आहेत. बॉस्केटबॉल स्पर्धेत १४ ते १६, कुस्ती १६ ते १८, शूटिंग ५ यासह अन्य क्रीडा प्रकारातही जवळपास १० खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. अनलॉकच्या टप्प्यात वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुलही गजबजत असून सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रात खेळाडूंकडून विविध क्रीडा स्पर्धांसाठी सराव केला जातो. कोरोनाच्या सावटातून सावरत खेळाडू हे राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवित असल्याने क्रीडा जगतात वाशिमचे नाव झळकत आहे. दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आणि फिट इंडियाच्या अनुषंगाने २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
००००००००००००००००
‘एव्हरेस्ट’ गाठण्याचे स्वप्न - यश इंगोले (फोटो आजचा १४)
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर निश्चित केलेले ध्येय सहज पूर्ण करता येते, अशाच एका ध्येयाची पूर्तता वाशिम येथील १९ वर्षीय यश मारोती इंगोले याने आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलीमांजारोची १९ हजार ३४१ फुटाची चढाई करून केली. भारतीय स्वातंत्र्यदिनी यशने किलीमांजारो शिखरावर राष्ट्रध्वज फडकविला. किलीमांजारो चढण्याचे ध्येय गाठल्यानंतर आता जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट गाठण्याचे स्वप्न आहे, असे यश इंगोले याने सांगितले.
०००००००००००
तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्नही निकाली निघावा!
जिल्हास्तरावर सुसज्ज क्रीडा संकुल असल्याने खेळाडूंची गैरसोय टळली आहे; परंतु मालेगाव, रिसोड येथील क्रीडा संकुलाचा प्रश्नही तातडीने निकाली निघणे आवश्यक आहे. मानोरा व मंगरूळपीर येथील तालुका क्रीडा संकुलाला विकासाची प्रतीक्षा आहे. वाशिम येथील तालुका क्रीडा संकुलासाठी जागेचा शोध अद्यापही पूर्ण झालेला नाही. तालुकास्तरीय क्रीडा संकुलही अद्ययावत व सुसज्ज असावे, असा सूर खेळाडूंमधून उमटत आहे.
०००००००
वाशिमला होणार कबड्डी प्रशिक्षण केंद्र!
भारत सरकारच्या भारतीय खेल प्राधिकरण अंतर्गत खेलो इंडिया या योजनेअंतर्गत वाशिम येथे विदर्भातील एकमेव खेलो इंडिया कबड्डी प्रशिक्षण केंद्रास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. वाशिम जिल्ह्यातील कबड्डी संघाने विभाग, राज्य यासह राष्ट्रीय पातळीवरही चमकदार कामगिरी केली आहे. विदर्भातील एकमेव कबड्डी प्रशिक्षण केंद्र वाशिमला होणार असल्याने ही बाब जिल्हावासीयांसाठी भूषणावह ठरत आहे.