वाशिम : मागील १५ दिवस दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे उर्वरित पेरणीला प्रारंभ झाला असून, यापूर्वी पेरणी केलेल्या पिकांनाही आधार मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सरासरी २१३ मिमी पावसाची नोंद झाली असली, तरी सार्वत्रिक स्वरूपाचा आणि सातत्यपूर्ण पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवले नाही, तर अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर होती. ही परिस्थिती पाहून काही शेतकऱ्यांनी पेरणीही स्थगित केली होती. कृषी विभागाच्या अहवालानुसार २८ जूनपर्यंत जिल्ह्यात ७० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. आता मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्राप्त आकडेवारीनुसार २ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी १८०.६३ मिमी पाऊस अपेक्षित असताना तब्बल २३४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यातही मागील दोन दिवसांत सार्वत्रिक पाऊस पडला. त्यातच जुलै महिन्याच्या पहिल्याच दोन दिवसांत जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पावसाची नोंद झाली. त्यात एकाच दिवसातील २० मिमी पावसाच्या नोंदीचा समावेश आहे. त्यापूर्वी झालेल्या पावसाने तगलेल्या पिकांना आता या पावसामुळे मोठा आधार मिळाला असून, शेतकऱ्यांनी खते देण्यासह फवारणीची कामेही सुरू केली आहेत, तर पेरणी खोळंबलेल्या भागात पेरणीला प्रारंभ झाल्याचे दिसत आहे. एकंदरित चित्र पाहता जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पडलेला पाऊस पिकांना संजीवनी देणारा ठरलेला असून, यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या पुनरागमनानंतर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी उसळल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात फवारणी, डवरणीला वेग
By admin | Published: July 03, 2017 2:31 AM