अकोला : पूर्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी गांधीग्रामच्या पुलावरून वाहत असल्याने सलग दुसऱ्या दिवशी आकोट मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. पूर्णेच्या पुरामुळे सलग दोन दिवस मार्ग बंद राहिल्याने एसटी महामंडळाला ३७ हजार ६00 कि.मी. च्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या असून, लाखोचा फटका सहन करावा लागला. एसटी महामंडळाच्या आकोट मार्गावर दिवसभरात ४0 बसफेऱ्या आहेत. अकोला, आकोट व तेल्हारा डेपो मिळून १३ हजार ८00 कि.मी. असलेल्या या फेऱ्या पुरामुळे एसटी महामंडळाला बुधवारी रद्द कराव्या लागल्या. गुरुवारीदेखील पूरस्थिती कायम असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती. दुसऱ्या दिवशीदेखील पुरामुळे या मार्गावरील वाहतूक बंद असल्याने एसटी महामंडळाला सलग दोन दिवस ३७ हजार ६00 कि.मी. च्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तूर्त विभागीय अधिकाऱ्यांकडे आर्थिक नुकसानीची आकडेवारी उपलब्ध नसली तरी, पूर्णेच्या पुरामुळे रापमच्या अकोला विभागाला लाखोचा आर्थिक फटका बसला आहे. *..तर वाहतूक सुरळीत राहिली असतीअकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा संततधार पाऊस झाल्यास, पूर्णेच्या पुरामुळे आकोट मार्गावरील वाहतूक प्रभावित होते. गांधीग्रामच्या पुलाची उंची कमी असल्याने त्याचा फटका या मार्गावरील वाहतुकीस सहन करावा लागतो. यावर कायमस्वरूपी पर्याय म्हणून गांधीग्राम येथून जवळच असलेल्या गोपालखेड येथे पूर्णा नदीवर उंच पूल उभारण्यास यावर्षी प्रारंभ झाला आहे. वास्तविक पाहता अनेक वर्षांपूर्वी या कामास मंजुरी मिळाली होती; पण प्रत्यक्ष कामास यावर्षी प्रारंभ झाला आहे. मंजुरी मिळताच या कामास प्रारंभ झाला असता, तर आजच्या घडीला या मार्गावरील वाहतूक सुरळीत राहिली असती, अन एसटी महामंडळास आर्थिक फटका सहन करावा लागला नसता. नव्या पूल उभारणीच्या कामासाठी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी पाठपुरावा केल्यास पुढल्या वर्षीचे चित्र कदाचित वेगळे राहू शकते.