वाशिम : एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास असल्याचे मानले जाते; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एसटीत शारीरिक अंतराचा नियम पाळणे अशक्य असल्याने हा प्रवास धोकादायक ठरू पाहत आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे दैनंदिन शेकडो प्रवाशांशी शारीरिक स्पर्श करीत प्रत्यक्ष संबंध येत असलेल्या वाहकांना ना चांगल्या दर्जाचे मास्क आहे, ना त्यांचा कोरोना योद्धा म्हणून लसीकरणासाठी विचार झालेला आहे. त्यामुळे एसटीचे वाहकच कोरोनाचे वाहक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात वाशिम, मंगरूळपीर, रिसोड आणि कारंजा येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार आहेत. तसेच मालेगाव आणि मानोरा येथे उपआगार कार्यान्वित आहे. प्राप्त माहितीनुसार, वाशिम आगारांतर्गत १२० वाहक कार्यरत असून ४५ एसटी बसेसच्या माध्यमातून दैनंदिन १,५०० ते १,६०० प्रवासी प्रवास करतात. मंगरूळपीर आगारांतर्गत ४५ वाहक, ४५ एसटी बस असून दैनंदिन ५०० ते ६०० प्रवासी प्रवास करतात. रिसोडमध्ये ८९ वाहक कार्यरत आहेत. या आगारांतर्गत दैनंदिन ४३ एसटी बस धावतात. १,३०० ते १,४०० प्रवासी एसटीने प्रवास करतात; तर कारंजा आगारांतर्गत ४० एसटी बस असून ९० वाहक कार्यरत आहेत. तसेच एसटीने दैनंदिन प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या १००० आहे.
याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ३४४ वाहकांचा सुमारे ३,६०० वेगवेगळ्या प्रवाशांशी रोजचा जवळचा संबंध येत आहे. असे असताना वाहकांना आगार व्यवस्थापनाने कुठलीच सुविधा पुरविलेली नाही. तोंडाला मास्क लावायचे तर ते स्वत:च्या पैशाने विकत घ्यावे लागत आहे. वाहकांच्या कोरोना चाचणीबाबत कुठलेही स्पष्ट निर्देश नाहीत किंवा त्यांचे लसीकरण करून घेण्याचेही प्रशासनाला गरजेचे वाटलेले नाही. त्यामुळे वाहकांचा जीव धोक्यात सापडला असून त्यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
....................
बॉक्स :
३४४ वाहकांचा दैनंदिन ३,६०० प्रवाशांशी संपर्क
वाशिम - १२० वाहक, ४५ फे-या, १६०० दैनंदिन प्रवासी
मंगरूळपीर - ४५ वाहक, २५ फे-या, ५०० दैनंदिन प्रवासी
रिसोड - ८९ वाहक, ४३ फे-या, १,५०० दैनंदिन प्रवासी
कारंजा - ८४ वाहक, ४० एसटी बस, १००० दैनंदिन प्रवासी
..................
कोट :
नोकरी टिकवायची तर एसटीत ठरावीक वेळेनुसार चढावेच लागते. स्वत:ची काळजी घेण्यासाठी तोंडाला मास्क वापरत आहे; मात्र ते पुरेसे नाही. कारण एसटीच्या प्रवासात तिकीट देऊन पैसे घेत असताना कुठला प्रवासी कसा, हे कळत नाही. प्रशासनाने किमान सुरक्षा प्रदान करायला हवी, अशी अपेक्षा आहे.
- संजय नाईक, वाहक